उच्च न्यायालयात आज ‘मुडा’ प्रकरणी सुनावणी
मुख्यमंत्र्यांच्या याचिकेविषयी कुतूहल
बेंगळूर : म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटपासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध राज्यपालांनी दिलेल्या परवानगीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणी गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांनी आपल्या विरोधात खटला चालविण्यास दिलेली परवानगी रद्द करावी, अशी रिट याचिका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. मागील वेळेस उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. त्यानुसार गुरुवारी त्यावर सुनावणी होणार असून उच्च न्यायालय कोणता निर्णय घेईल याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागली आहे.
राज्यपालांनी खटल्याला दिलेली परवानगी उच्च न्यायालय उचलून धरेल का? किंवा राज्यपालांचा निर्णय रद्द करेल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहे. एखाद्या वेळेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यास राज्य राजकारणात वेगाने राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.