बाणस्तारी अपघातप्रकरणी आजपासून सुनावणी
आपचे अमित पालेकर यांच्यासह सात आरोपी
पणजी : बाणस्तारी पुलावर 6 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी तब्बल 26 महिन्यानंतर आज सोमवारपासून फोंडा न्यायालयात सुनावणी सुऊ होत आहे. तिघा जणांच्या मृत्यूसाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी परेश सावर्डेकर, आपचे प्रमुख अमित पालेकर यांच्यासह सात आरोपींची नावे जाहीर केली आहेत. बाणस्तारी पुलावर झालेल्या या अपघातात चार कार आणि दोन मोटारसायकलींचा समावेश होता. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते की, एका वेगाने येणाऱ्या मर्सिडीज जीए लएस एसयूव्हीने वाहनांना धडक दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे की संशयित आरोपी परेश सावर्डेकरने 6 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पणजीकडे जात असताना बाणस्तारी पुलावर दारू पिऊन अपघात घडवून आणल्याचा गुन्हा केला होता. या अपघातात तिघेजण जागीच मृत्युमुखी पडले आणि सहाजण जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी गुन्हे शाखेने 1,158 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे आणि 121 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपपत्रात अमित पालेकर, गणेश लमाणी, अभिजीत शेट्यो, विष्णू तारकर, आत्रे सावंत आणि प्रज्योत चोडणकर यांची नावे आहेत. अपघात प्रकरणात न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी फोंडा यांच्यासमोर सोमवारपासून सुनावणी सुऊ होणार आहे.