‘हृदय’ जपा आणि जाणून घ्या!
उद्या जागतिक हृदय दिन : सर्व अवयवात हृदय सर्वाधिक महत्त्वाचे : निरोगी जीवनासाठी जागऊकता आवश्यक
मनीषा सुभेदार /बेळगाव
आपले आरोग्य निरोगी असावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु, सर्वच जण आरोग्याबाबत फार जागरुक आहेत, असे नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असला तरी हृदय हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. उद्या असणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त म्हणूनच ‘केअर हार्ट-नो (ख्हदै) हार्ट’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अरिहंत हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांची ही मुलाखत-
►हृदय किती महत्त्वाचे?
-हृदयाशिवाय आपले जीवनच नाही! हृदय नसेल तर जीवन कसे असेल? लोक म्हणतात, की मन चांगले पाहिजे. परंतु, हृदय नसेल तर मन चांगले असूनही उपयोग होणार नाही. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
►एखाद्याचे हृदय सक्षम नाही, हे ओळखण्याची लक्षणे कोणती?
-हृदयाचे मुख्य काम शरीराला रक्तपुरवठा करणे आहे. हृदय पंपिंग करत असते. शरीराला ऑक्सिजन व ग्लुकोज पुरवठा रक्तामधूनच होतो. हृदय असमर्थ असेल तर त्याचे पंपिंग कमी होऊ शकते. जर काम करत असताना छातीत दुखणे, धाप लागणे व काम थांबविल्यास दुखणे व धाप थांबली तर ते हृदयाशी संबंधित दुखणे आहे. याशिवाय चालताना जर धाप लागली तरीसुद्धा हृदयाची तपासणी आवश्यक आहे. दम्यामुळेसुद्धा धाप लागते. परंतु, हृदय कमकुवत झाल्याची धाप ही काम करतानाच जाणवते.
►असा त्रास हृदयाशी संबंधित आहे, हे कसे ओळखावे?
- यासाठी बीपी, वजन, शुगर, कोलेस्ट्रॉल यांची तपासणी, ईसीजी काढला जातो. ईसीजी नॉर्मल आला तरी हृदय नॉर्मल आहे, असे नाही. इकोमुळे हृदयाच्या झडपा क्षीण झाल्या आहेत का? हृदयाला छिद्र आहे का? हे पाहिले जाते. तरीही खात्री करण्यासाठी हृदयाला स्ट्रेस देऊन स्ट्रेस टेस्ट केली जाते. सीटी स्कॅनमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचा फोटो काढून ब्लॉक आहेत का? हे लक्षात येते.
►अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी आवश्यकच असते का?
- कॅथलॅबमध्ये हाताच्या एका रक्तशिरेमधून एक वायर हृदयापर्यंत नेऊन ‘डाय इंजेक्ट’ केले जाते. ज्यामुळे हृदयांच्या ठोक्यांचा फोटो काढता येतो व किती ब्लॉक्स आहेत ते कळते. त्यावरून औषध की शस्त्रक्रिया हे ठरविले जाते. अँजिओप्लास्टीमध्ये एक वायर पास करून बलूनने ब्लॉक ओपन करून रक्तवाहिनी मोठी केली जाते व पुन्हा धोका उद्भवू नये म्हणून स्प्रिंग म्हणजेच स्टेंट बसवावे लागते. मात्र, स्टेंट ही फॉरेन बॉडी असल्याने रक्त पातळ होण्याचे औषध घ्यावे लागते. बायपास म्हणजे हृदयाच्या जवळ नवीन मार्गच तयार करून रक्तपुरवठा होण्यासाठी वाट केली जाते.
►कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होते?
- कोलेस्ट्रॉल शरीराला आवश्यकच आहे. परंतु, ते अतिरिक्त वाढते तेव्हा त्याचा त्रास होऊ लागतो. प्रामुख्याने मधुमेही तसेच धूम्रपान, मद्यपान करणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे.
►हृदयविकाराची कारणे कोणती?
- बैठी जीवनशैली, सततचा ताण, तंत्रज्ञानामुळे रात्रीचे वाढलेले जागरण, पचनक्रिया मंदावणे आणि व्यायामाचा अभाव, ही महत्त्वाची कारणे आहेत. व्यायाम अतिशय आवश्यक आहे. परंतु, जिममध्ये केला जाणारा व्यायाम स्नायू बळकट करतो. मात्र शारीरिक हालचालीसाठी पोहणे, सायकल चालविणे, दोरीच्या उड्या मारणे महत्त्वाचे आहे. अलीकडे बरीचशी तरुणाई पीजीमध्ये, हॉस्टेलमध्ये राहते. त्यांनी कच्च्या भाज्या, फळे, दूध, दही खाणे आणि चालणे आवश्यक आहे.
►अलीकडे प्रत्येकाला ताण असतो, त्याचे नियंत्रण शक्य आहे का?
- निश्चितच शक्य आहे. ताणाबाबत म्हणाल तर वास्तव स्वीकारणे आणि नकारात्मक विचारांना थारा न देणे महत्त्वाचे आहे. किमान दोन वेळा पंधरा मिनिटांची ध्यानधारणा निश्चितच उपयुक्त ठरते. त्याचा फायदा केवळ हृदय सक्षम होण्यासाठीच नव्हे तर मनस्वास्थ्यासाठी होतो. शिवाय औषधांचे प्रमाण कमी होते. याचबरोबर स्वत:ला एका छंदामध्ये गुंतविणे उत्तम.
►कोविडनंतर हृदयविकारांची संख्या वाढली आहे?
- कोविड काळात हृदयविकार वाढले हे नक्कीच. अनेकांच्या हृदयामध्ये गाठ निर्माण झाली. पूर्वी पन्नाशीनंतर हृदय तपासणी करून घ्या, असे आम्ही सांगत होतो. आज आजोबा नातवाला तपासणीसाठी आणतात, असे दुर्दैवी चित्र आहे. मात्र, हा परिणाम कोविडमुळेच झाला आहे का? हे काटेकोरपणे तपासले जाण्याची गरज आहे.
खेळासाठी मुलांना सक्ती आवश्यक
भारतीय आहार हा अत्यंत चौरस आहार आहे. परंतु, प्रोसेस्ड, पॅक्ड फूड सातत्याने सेवन केल्याने ते त्रासदायक ठरते. त्यामुळे शक्यतो ताजे अन्न घ्यावे. महत्त्वाचे म्हणजे मोठ्यांच्याच नव्हे तर मुलांच्यासुद्धा हालचाली कमी झाल्याने शाळांमध्ये एक तास खेळासाठी व एक तास छंदासाठी सक्तीचा केल्यास अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो.