ऑस्ट्रेलियन संघात हिलीचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेला रविवारी सिडनीमध्ये प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन वनडे संघामध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज अॅलिसा हिलीचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत पाक संघाविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार हिलीला दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे तिला बऱ्याच मालिकांना मुकावे लागले होते. तसेच ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिगबॅश लीग स्पर्धेत खेळतानाही तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे ती भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अॅशेस मालिकेत हिली खेळणार असल्याचे सांगण्यात आले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि एकमेव कसोटी सामना आयोजित केला आहे.
इंग्लंड महिला संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज केटी क्रॉसला दुखापतीची समस्या अद्याप भेडसावत आहे. इंग्लंडची कर्णधार नाईट ही क्रॉसच्या परिस्थितीवर नजर ठेऊन आहे. रविवारच्या सामन्यापूर्वी तिला तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. मात्र लॉरेन बेल आणि लॉरेन फिलेर यांचा मात्र इंग्लंड संघात निश्चित समावेश करण्यात आला आहे. सलामीच्या जॉर्जिया व्हॉलच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहिल.