पंजाबसाठी अर्शदीप लढला, शेवटी ऋतुराजचा संघ जिंकला
पंजाबला नमवत महाराष्ट्र सेमीफायनलमध्ये : सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचे शतक
वृत्तसंस्था/ वडोदरा
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. शनिवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने पंजाबचा 70 धावांनी पराभव केला. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 275 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाबचा संघ 44.4 षटकांत 205 धावांवर ऑलआऊट झाला. शतकवीर अर्शिन कुलकर्णी, अंकित बावणे, निखिल नाईक, मुकेश चौधरी यांचा महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा राहिला. 12 जानेवारी रोजी विदर्भ व राजस्थान यांच्यात उपांत्यपूर्व सामना होणार आहे, यांच्यातील विजेत्यांशी महाराष्ट्राची उपांत्य लढत होईल.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर व कर्णधार ऋतुराज गायकवाडला अर्शदीपने पहिल्याच षटकात बाद करत महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. यानंतर स्टार फलंदाज सिद्वेश वीरला भोपळाही फोडता आला नाही. यावेळी महाराष्ट्राने 8 धावांतच 2 विकेट गमावल्या होत्या. यावेळी सोलापूरचा युवा फलंदाज अर्शिन कुलकर्णी व अंकित बावणे यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने 145 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. अंकित 85 चेंडूत 60 धावा काढून बाद झाला. पण, अर्शिनने मात्र संयमी खेळी साकारताना या सामन्यातून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिलेवाहिले शतक झळकावले. त्याने 137 चेंडूचा सामना करताना 14 चौकारासह 107 धावांची खेळी साकारली. याशिवाय, निखिल नाईकने आक्रमक खेळी करताना 29 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारासह नाबाद 52 धावा केल्या. यामुळे महाराष्ट्राला 50 षटकांत 6 बाद 275 धावापर्यंत मजल मारता आली. सत्यजित बचाव 15 चेंडूत 20 धावा करुन नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग सर्वात प्रभावी गोलंदाज होता. त्याने 56 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
पंजाबवर पराभवाची नामुष्की
महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या 276 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 205 धावांत ऑलआऊट झाला. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर प्रभसिमरन सिंग (14), कर्णधार अभिषेक शर्मा (19) दोघेही लवकर बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे पंजाबची एकवेळ 5 बाद 79 अशी बिकट स्थिती होती. अनमोलप्रीत सिंगने 48 तर अर्शदीप सिंगने 39 चेंडूत 49 धावांची वेगवान खेळी केली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर इतर तळाचे फलंदाजही अपयशी ठरले. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने 44 धावांत 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र 50 षटकांत 6 बाद 275 (अर्शिन कुलकर्णी 10, अंकित बावणे 60, निखिल नाईक 52, अर्शदीप सिंग 3 बळी)
पंजाब 44.4 षटकांत सर्वबाद 205 (अनमोलप्रीत सिंग 48, सनवीर सिंग 24, अर्शदीप सिंग 49, मुकेश चौधरी 3 बळी, प्रदीप दाढे 2 बळी).
देवदत्तची शतकी खेळी, बडोद्यावर ठरली भारी
वडोदरा : विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटक व बडोदा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात कर्नाटकने बडोद्यावर पाच धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. वडोदरा येथील मोतीबाग स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने 8 गडी गमावत 281 धावा केल्या. सलामीवीर देवदत्त पडिक्कलने लिस्ट ए क्रिकेटमधील नववे शतक झळकावताना 99 चेंडूत 15 चौकार व 2 षटकारासह 102 धावा केल्या. के. अनीशने 52 धावांची उपयुक्त खेळी केली. कर्नाटकने विजयासाठी दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना बडोद्याला 276 धावापर्यंतच मजल मारता आली. शाश्वत रावतने सर्वाधिक 104 धावांची खेळी केली तर अतित शेठने 56 धावांचे योगदान दिले. इतर बडोद्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने त्यांना हा सामना पाच धावांनी गमवावा लागला. आता, गुजरात व हरियाणा यांच्यातील विजेत्यांशी कर्नाटकचा उपांत्य सामना होईल.