एचएमपीव्ही संसर्गासंदर्भात आरोग्य यंत्रणा सतर्क
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस संसर्गाचे रूग्ण वाढत आहेत. या एचएमव्हीपी संसर्गित रूग्णांमुळे कोरोनासारखी साथ देशातही येण्याचा धोका आहे. बेंगळूर येथे एका आठ महिन्याच्या बालकामध्ये एचएमव्हीपीचा संसर्ग दिसून आला आहे. यासंदर्भातील चाचणी खासगी लॅबमध्ये झालेली आहे. परिणामी आरोग्य विभागाने यासंदर्भात शासकीय लॅबमध्ये या नमुन्याची तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एचएमव्हीपी’संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुणे आरोग्य सेवा मंडळाचे संचालक डॉ. नितीन अंबार्डेकर यांनी गाईडलाईन दिल्या आहेत. दरम्यान, भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, मात्र योग्य काळजी घ्यावी, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाने आवाहन केले आहे.
चीनमध्ये सध्या लागण झालेल्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस या श्वसन रोगांची संख्या वाढत आहे. चीनमध्ये या रोगांच्या अलीकडील वाढीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसमुळे होणारे आजार देखील समाविष्ट आहेत. भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, मात्र योग्य काळजी घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आवाहन केले आहे.
यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या परिपत्रकात कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय चॅनेलच्या अपडेट्सचे अधिकारी बारकाईने निरीक्षण करत आहेत. ‘एचएमव्हीपी’सारखे व्हायरस भारतात आधीपासूनच प्रचलित आहेत. सध्या आरोग्य पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य प्रकरणांना हाताळण्यास सक्षम आहे. देखरेख ठेवणारी यंत्रणा आणि आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. नागरिकांना मानक आरोग्य खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र आजारी रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेण्यांचा समावेश आहे.
घाबरु नका, सर्दीसारखाच आजार
वैद्यकीय तज्ञांच्या मते या व्हायरसबाबत 20 वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्यात याच्या संसर्गाची प्रकरणे समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे. यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधेच दिली जातात. तसेच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणांत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नाही.
एचएमपीव्ही विषाणू काय आहे?
उपलब्ध माहितीनुसार, विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती. तेव्हापासून या विषाणूने स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुळे चिमण्यांना संसर्ग होत नाही. मानवाला 2001 मध्ये याबाबत माहिती मिळाली होती. म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो. या विषाणूचा इन्क्युबेशन पीरियड साधारणपणे 3 ते 6 महिने असतो. या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो. यामुळे रुग्णाला ताप, खोकला, नाक चोंदणे, श्वास घ्यायला त्रास होणे, याचा सामना करावा लागू शकतो. याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळे ब्राँकाइटिस किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो. या विषाणूचा इन्क्युबेशन पीरियड साधारणपणे 3 ते 6 महिने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे, यावर ते अवलंबून असते.
एचएमपीव्ही कसा पसरतो?
खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो. हात मिळवणे, गळाभेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो. खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्या ठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो.
काय काळजी घ्यावी?
एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याच्यापासून दूर रहा. खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कापड ठेवा. त्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा. काही तासांनी ते साबणाने स्वच्छ धुवा. सर्दी-खोकला असेल तर मास्क परिधान करा आणि घरीच आराम करा. विषाणूसाठी अँटिव्हायरल औषध किंवा लस तयार केलेली नाही.