आरोग्यमंत्र्यांचे गैरकृत्य गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे
आरोग्यमंत्र्यांना होऊ शकतो दोन वर्षांचा कारावास : कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा दावा
पणजी : गोमेकॉतील वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश यांनी सदर कथित ऊग्णाशी गैरवर्तन केले की नाही याचा पुरावा नसला तरी त्याच डॉक्टरला धडा शिकविण्याच्या नादात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉत जो अवतार धारण केला ते मात्र त्यांचे गैरवर्तन होते व त्यासाठी ते गुन्हेगार ठरत आहेत. डॉक्टरचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्यास पुढे सरसावलेल्या आरोग्यमंत्र्यांनाच सदर गुह्यासाठी दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो, कारण यापूर्वी अशाच एका प्रकरणात पंजाब उच्च न्यायालयाने तसा निवाडा दिला होता, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. आरोग्यमंत्र्यांचे शनिवारचे वर्तन हे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हेगारी स्वऊपाचे ठरत आहे. याची स्वत: एक डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी व आरोग्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून निलंबित करावे, किंवा आरोग्यमंत्र्यांनी स्वकृत्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणीही पाटकर यांनी केली आहे.
आरोग्य सेवा इतिहासातील ‘काळा दिवस’
रविवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी तुलीयो डिसोझा, मनिषा उसगांवकर आणि जॉन नाझारेथ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पाटकर यांनी आरोग्यमंत्र्यांचे सदरचे गैरवर्तन म्हणजे गोव्याच्या आरोग्य सेवा इतिहासातील ‘काळा दिवस’, अशी टीका केली. सदर डॉक्टरला अद्दल घडविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी केलेली सदर कृती ही निव्वळ ड्रामेबाजी होती हेच स्पष्ट होते. अन्यथा ‘आकस्मिक भेटी’तही त्यांच्या सोबत व्हीडिओग्राफर कसा पोहोचला, असा सवाल पाटकर यांनी केला. या भेटीत आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉत अक्षरश: दहशत माजवली, स्वत:च्या गर्विष्ट स्वभावाचे थेट प्रदर्शनच मांडले. आपण एक मंत्री आहोत याचेसुद्धा भान व ताळतंत्र न ठेवता स्वत:च्या घरातील नोकराशी वागावे त्या पद्धतीने ते सदर अधिकाऱ्याशी बोलले व वागले, असे पाटकर म्हणाले. देशात आता राजेशाही संपलेली आहे, आम्ही लोकशाहीत वावरत आहोत, याचे भान आरोग्यमंत्र्यांनी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राणे यांच्या अशाप्रकारच्या वर्तनाचे पहिलेच उदाहरण नसून यापूर्वी त्यांनी गोमेकॉतीलच वरिष्ठ डॉक्टर प्रदीप नाईक यांनाही अशीच अपमानास्पद वागणूक दिली होती. त्याशिवाय हॉस्पिसियोत एका निवृत्तीकडे पोहोचलेल्या वरिष्ठ महिला कर्मचाऱ्याला अकारण सस्पेंड केले होते. तोच प्रकार दंत महाविद्यालयाही करताना दोघांना निलंबित केले होते. यावरून आरोग्यमंत्र्यांची मानसिकता दिसून येते. म्हणुनच आता त्यांचीच मानसिक आरोग्य तपासणी करून घेण्याची वेळ आली आहे, असे पाटकर म्हणाले. श्री. डिसोझा, श्री. नाझारेथ यांनीही यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी टीका करताना हे प्रकार असेच चालू राहिल्यास डॉक्टर्स काम करण्यास तयार होणार नाहीत. परिणामी राज्यातील संपूर्ण आरोग्यसेवाच खिळखिळी होईल, अशी भीती व्यक्त केली.
लोकशाही देशात आरोग्यमंत्र्यांची हुकुमशाही? : कुतिन्हो
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कुट्टीकर यांना निलंबित करण्याच्या घडलेल्या प्रकाराचा निषेध केला. आपल्या लोकशाहीप्रधान देशात प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. तरीही आरोग्यमंत्री केवळ स्वत:चेच टुणटुणे वाजवत होते व डॉक्टरला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीच देत नव्हते. हा कोणत्या देशातील न्याय आहे, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.
स्वत:चा अहंकार जपण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी डॉ. कुट्टीकर यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. तसेच संपूर्ण सोशल मीडियावरून त्याची जाहिरातबाजीही केली. मात्र ते कृत्य आता त्यांना महागात पडणार आहे. त्यांचे हे वर्तन संपूर्ण आरोग्यसेवेवरच घाला घालणारे आहे. प्रत्येक डॉक्टरचा तो अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.