जिल्ह्यात स्थापन होणार आरोग्यमंत्री वैद्यकीय कक्ष
शासकीय विश्रामगृह येथे लवकरच होणार सुरु
कोल्हापूर
जिल्ह्यातील एखादा नागरिक आजारी पडला व त्याला उपचाराबाबत खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात नव्याने आरोग्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून होणार आहे. सध्या या कक्षाच्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात येत असून येत्या आठ ते दहा दिवसात हा कक्ष नागरिकांच्या सोईसाठी शासकीय विश्रामगृह येथे सुरु होणार आहे.
आरोग्यमंत्र्यांच्याकडे जिल्ह्यातून समस्या घेऊन येणाऱ्या शासकीय कर्मचारी तसेच नागरिक व रुग्णांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयमार्फत मंत्र्यांकडे दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गाऱ्हाणे ऐकुन त्यांना आवश्यक ती मदत करणे हे काम चालते. याबरोबरच या ठीकाणी आरोग्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करुन येणाऱ्या रुग्णास महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य व आयुषमान भारत योजनेत समाविष्ट असणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा बाबत मार्गदर्शन करुन पाठपुरावा करणे, त्याच बरोबर योजनेतील रुग्णालयात रुग्णाच्या वैद्यकीय बिलाच्या प्रतीपुर्तीसाठी व बिला मध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराबाबत समन्वय साधणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत योग्य मार्गदर्शन करुन अर्ज स्विकारून मंजुरीबाबत पाठपुरावा करणे, सीपीआर येथे दाखल रुग्णाला येण्राया अडचणी बाबत मदत करणे, गंभीर व दुर्धर आजारातील रुग्णाला पुढील उपचारासाठी आवश्यकतेनुसार मुंबई,पुणे येथील रुग्णालयात दाखल करणेसाठी गरज पडल्यास १०८ रुग्णवाहीकेची सोय करणे.त्याच बरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे महाराष्ट्रातील नोंदणीकृत रुग्णालयात १० टक्के कोट्यातून बेड उपलब्ध करुन उपचाराबाबत समन्वय साधणे, गरजु रुग्णाला रक्त उपलब्ध करुन देणे, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांना खाजगी व शासकीय रुग्णालयात गरजेनुसार शस्त्रक्रिये साठी समन्वय साधून पाठपुरावा करणे आदी कामे या कक्षाकडून केली जाणार आहेत.
या कक्षामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी,एक सामाजिक कार्यकर्ता, दोन समन्वय हे शासकीय सेवेतील कर्मचारी असणार आहेत. तर एम.जे.पी.जे.एस.वाय कडील २५ आरोग्यमित्र व डाटा एन्ट्री ऑपरेटर असणार आहेत. या कक्षाचा मुख्य उद्देश हा जिह्यातील प्रत्येक नागरिकाला किवा रुग्णाला योग्य, वेळेत आणि कोणत्याही अडचणी शिवाय प्रत्येक योजनेचा व उपचाराचा लाभ पोहचवणे हा असून लवकरच सुरु होणार आहे.
आरोग्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना राज्यभर
राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आरोग्यमंत्री वैद्यरकीय सहाय्यता कक्षाची राज्यभर स्थापना केली जाणार आहे. त्यानुसार जिह्यातील रूग्णांच्या सोईसाठी कोल्हापूरमध्येही या कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा कक्ष सुरु करून रूग्णांची गैरसोय टाळली जाणार आहे.
प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य