आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे डॉक्टरांविऊद्धचे वर्तन लज्जास्पद
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर यांच्याकडून खरमरीत टीका
प्रतिनिधी/ पणजी
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे सत्तेच्या जोरावर सरकारी अधिकाऱ्यांना केराप्रमाणे वागणूक देत आहेत. गोवा मेडिकल कॉलजमधील एका डॉक्टराचा बेजाबदारपणे, बेशिस्तपणे, अहंकारवृत्तीने अपमान केला आहे. या आरोग्य अधिकाऱ्यावर अन्याय झालेला आहे. या डॉक्टरांना वाचविण्याची गरज आहे. कोविड काळात डॉक्टरांनी आपली सेवा इमाने-इतबारे बजावूनही त्यांना आज विश्वजित राणे यांनी दिलेली वागणूक ही लज्जास्पद आहे, त्यामुळे या मंत्र्याला त्वरित हटवावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
आरोग्यमंत्री राणे हे कदाचित मानसिकरित्या ठिक नाहीत. त्यांनी गोमेकॉतील डॉक्टरांना दिलेली वागणूक ही योग्य नाही. कोविड काळात व्हेंटीलेटरबाबतही भ्रष्टाचार केलेले आहेत. मंत्री राणे हे निक्रीय मंत्री असल्याने त्यांनी डॉक्टरांचा केलेला अपमान हा गोमंतकीयांनी न विसरता त्यांचा निषेध करावा, अशी मागणीही अमित पाटकर यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही अमित पाटकर यांनी केली.
आरोग्यमंत्री राणे यांना तत्काळ निलंबित करा : गिरीश चोडणकर
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधील एका वरिष्ठ डॉक्टरांसोबत केलेले वर्तन हे लज्जास्पद आहे. जर विश्वजित राणे स्वत:ला ‘बॉस’ समजून विभागातील डॉक्टरला न ऐकता निलंबित करू शकतात, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपल्या मंत्रिमंडळातील कनिष्ठ सहकाऱ्यावर तोच नियम लागू करून, त्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करावे,” अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
गोवा मेडिकल कॉलेज कॅज्युअल्टीमधील चीफ मेडिकल ऑफिसर सोबत राणेंचे एकाधिकारशाही वर्तन निषेधार्ह असून, ते लज्जास्पद, पक्षपाती, गैरव्यावसायिक आणि सत्तेचा उघड गैरवापर आहे, असे चोडणकर यांनी सांगितले. “परिस्थितीला परिपक्वपणे आणि माणुसकीने हाताळण्याऐवजी, मंत्र्यांनी सार्वजनिक अपमानाची भूमिका स्वीकारली. डॉक्टर चुकीचा असो वा नसो, त्यांना आपले म्हणणे मांडण्याचा मूलभूत हक्क नाकारून, त्यांच्या कनिष्ठांसमोर आणि ऊग्णांसमोर त्यांचा अपमान करणे पूर्णत: अशोभनीय आहे,” असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री राणे यांनी सार्वजनिक माफी मागावी : संदीप हेबळे
“एक आदरणीय डॉक्टर एका अशा व्यक्तीकडून अपमानित होतो, ज्याने नेतृत्वाचा आदर्श दाखवायला हवा होता. हे प्रशासन नाही, तर अहंकार आहे. गोवा सरकार व गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठराविक शिस्तपालनाचे नियम आहेत, जे आरोग्यमंत्री राणे यांनी स्पष्टपणे पायदळी तुडवले आहेत. आम्ही विश्वजित राणे यांच्याकडून औपचारिक आणि सार्वजनिक माफीची तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून बडतर्फीची मागणी करतो. कारण आरोग्यमंत्र्यांचे अयोग्य वर्तन लज्जास्पद आहे. राणे यांच्या अत्यंत असभ्य, उद्धट आणि लज्जास्पद वर्तनाने खरोखरच धक्का बसला. हे पहिल्यांदाच नाही. अनेक वेळा त्यांनी केवळ ऐकून न घेतल्याबद्दल डॉक्टरांचा अपमान केला होता. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे, असे गोवा आरटीआय फोरमचे जॉईंट सेक्रेटरी संदीप हेबळे म्हणाले.