कॅन्सरबाबत जागृतीसाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न
निदानानंतर योग्य उपचार घेणे आवश्यक : आरोग्य खात्याकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात 547 रुग्ण
दिवसांतून 6 ते 8 वेळा शौचाला जावे लागणे
- 15 दिवसांत भरून न येणारी अंगावरील जखम
- खूप दिवसांपासून नाक, संडास, मूत्र, तोंडावाटे रक्त जाणे
- शरीरावर गाठ आढळणे व ती वाढत जाणे
- पचन, गिळण्यास त्रास होणे, वजन कमी होणे
- कमी न होणारा खोकला आणि रक्तमिश्रित कफ जाणे
अमृत वेताळ/बेळगाव
कॅन्सर म्हटले की आजही भीती वाटते. परंतु, ही भीती कमी व्हावी आणि कॅन्सरबद्दल जनजागृती करावी, यासाठी आरोग्य खाते प्रयत्नशील आहे.कॅन्सर झाल्यास घाबरण्यापेक्षा योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बेळगाव जिल्ह्यात एप्रिल ते 30 ऑक्टोबरदरम्यान 8 लाख 56 हजार 429 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 65 महिलांना गर्भाशयाचा, 56 जणांना तोंडाचा व 91 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर तसेच 235 जणांना अन्य प्रकारचे कॅन्सर झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. व्यायाम न करणे, असमतोल आहार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मद्य आणि ताणतणाव ही पाच प्रमुख कारणे मुख, स्तन आणि गर्भकंठ यासारख्या कॅन्सरला आमंत्रण देणारी आहेत. जिल्हा आरोग्य खात्याकडे उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 547 कॅन्सरबाधित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
कॅन्सरबाबत आरोग्य खात्याकडून जनजागृती सुरू असली तरीही हा आकडा दरवर्षी वाढत चालला असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 3 ते 5 हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावांसाठी एक उपकेंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर (सबसेंटर) सुरू करण्यात आली आहेत. त्यावर समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), प्राथमिक आरोग्य सुरक्षा अधिकारी कार्यरत असतात. त्याचबरोबर आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन जनतेच्या आरोग्याबद्दलची माहिती घेतली जाते. यावेळी संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांचे स्क्रिनिंग केले जाते. कॅन्सरचा रुग्ण आढळल्यास त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, सीएचसी, तालुका आरोग्य हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठविले जातात. त्यानंतर त्यावर औषधोपचार केले जातात.
मद्याचे दुष्परिणाम
सध्या तरुणाईसह बहुतांश जणांना मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जडले आहे. दारूचे अतिसेवन केल्यास लिव्हर कॅन्सर होण्यासह मूत्रपिंडाचा कॅन्सरही होतो. जिल्ह्यात अनेकजण या आजारामुळे त्रस्त असून बहुतांश वेळा मृत्यूही ओढवतो.
तंबाखूजन्य पदार्थ
तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास अत्यंत हानिकारक आहेत. बिडी, सिगारेट, खैनी, मावा, तपकीर, तंबाखू यासारख्या पदार्थांपासून दूर राहावे. तात्पुरर्ती गुंग देणारे हे पदार्थ आरोग्यावर दूरगामी परिणाम करतात. यापूर्वी लोक दातांना तपकीर किंवा तंबाखूची राख घासत होते. हा प्रकार धोकादायक असून शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आहार कोणता घ्यावा?
कॅन्सरला आमंत्रण देणारा असमतोल आहार हे कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात 40 टक्के फळे व भाजीपाला, 40 टक्के प्रथिने व कर्बोदके यांचा वापर करणे गरजेचे आहे. उर्वरित 20 टक्के दुग्धजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ घ्यावेत.
व्यायामही महत्त्वाचा
व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा असून निरोगी आरोग्याचा मंत्र आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान अर्धा तास घाम येईल असा व्यायाम केला पाहिजे. दररोज शक्य नसल्यास आठवड्यातील 5 दिवस रोज 30 मिनिटे याप्रमाणे 150 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुख कॅन्सर-लक्षणे
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मुख कॅन्सर होतो. जीभ आणि जबड्यातील आतील भागात पांढरे आणि लाल चट्टे आढळून येतात.
गर्भकंठ कॅन्सर-लक्षणे
अंगावरून रक्त किंवा पांढरा स्त्राव नियमित जाणे, लहान वयात लग्न, वारंवार होणारे बाळंतपण, ओटीपोटाचे घाव, अतिमोठे ओटीपोट, एचपीव्ही संसर्ग आणि एचपीव्ही पॉझिटिव्ह असणे ही प्रमुख कारणे आहेत.
ब्रेस्ट कॅन्सर-लक्षणे
ब्रेस्ट कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. उदा. लठ्ठपणा, आनुवंशिकता, स्तनपान करण्याचा कालावधी कमी करणे किंवा स्तनपान न करणे, हार्मोन्सचा वापर करणे ही स्तन कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे आहेत. 20 वर्षांवरील तरुणी आणि महिलांनी महिन्यातून एका निश्चित तारखेला तपासणी करणे गरजेचे आहे. ब्रेस्ट कॅन्सरची गाठ दुखत नाही, त्यामुळे ती लवकर लक्षात येत नाही. याच कारणास्तव नियमित तपासणी आवश्यक आहे. त्वचेच्या रंगात बदल होणे, दुधाव्यतिरिक्त दुसरा स्त्राव होणे, त्वचेवर खड्डा पडणे, सूज येणे अशी लक्षणे दिसल्यास कॅन्सर तज्ञांशी संपर्क करणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांवर शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी किंवा औषधोपचार केले जातात. यातून रुग्ण पूर्ण बरा होत नसला तरी त्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
खात्यामार्फत योग्य प्रकारचे उपचार...
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 25 एप्रिल ते 30 ऑक्टोबरपर्यंत एकूण 8 लाख 56 हजार 429 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 56 महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर, 156 जणांना मुख कॅन्सर, 91 महिलांना स्तन कॅन्सर व 235 जणांना इतर प्रकारचे कॅन्सर झाले असून अशा प्रकारचे 547 कॅन्सरबाधित रुग्ण आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळणे, मद्यप्राशन पूर्णपणे बंद करणे, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे, समतोल आहार, आहारामध्ये फळे आणि भाजीपाला यांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. कॅन्सरबाधित रुग्णांना जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याकडून योग्य प्रकारचे उपचार दिले जातात.
-डॉ. नितीन एच., जिल्हा कार्यक्रम संयोजक (आरोग्य व कुटुंब कल्याण खाते)
