Karad News : लम्पी आजारामुळे कराड तालुक्यातील गायींच्या आरोग्याची चिंता
सदाशिवगडावर चरावयास सोडलेल्या 20 गायींना लम्पी आजाराची लागण
कराड : कराड तालुक्यातील सदाशिवगडावर चरावयास सोडलेल्या जवळपास २० गायींना लम्पी सदृश्य आजाराची लागण झाली असून त्यांच्या आंगावर मोठ्या प्रमाणात फोड आले आहेत. अद्याप गायींच्या मालकांना याचा थांगपत्ता नसल्याने गायी उपचारापासून दूर आहेत. गडावर एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास खड्डा काढणे शक्य नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.
किल्ले सदाशिवगड परिसरातील हजारमाची, राजमाची, वनवासमाची व बाबरमाची आदी गावातील काही शेतकरी पावसाळा सुरू झाल्यानंतर खिलार जातीच्या गायी व वासरे चरण्यासाठी गडावर सोडत असतात. जोपर्यंत गडावर चारा व पाणी उपलब्ध आहे. तोपर्यंत त्या गायी गडावरच मुक्कामी असतात. सध्या गडावर जवळपास ५० हून अधिक खिलार जातीच्या गायी व वासरे आहेत. या गायींना लसिकरण केले आहे की नाही याची पशुवैद्यकीय विभागाकडे माहिती उपलब्ध नाही.
वास्तविक काही महिन्यांपासून सदाशिवगड विभागातील गावांत खिलार जातीच्या गायी, वासरांत लम्पी आजाराची साथ सुरू आहे. आत्तापर्यंत हजारमाची व बाबरमाचीत जवळपास १० ते १२ जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र गडावर मुक्कामी असलेल्या जवळपास २० गायी व वासरांच्या अंगावरही मोठ्या प्रमाणात फोड आल्याचे गडप्रेमींच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. या गायींवर जर वेळेत उपचार झाले नाहीत तर बाकीच्या गायींनाही हा आजाराचा धोका संभवतो.
गडावर एखादे जनावर मृत झाले तर त्याची विल्हेवाट लावणे जिकीरीचे काम असते. गडावर जेसीबीसारखे मशीन जात नाही, तर माणसाने खड्डा काढणे शक्य नाही. त्यामुळे उघडयावर मृत जानावरे पडून रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित गायींच्या मालकांनी आपापल्या गायी नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी विभागातील गडप्रेमीतून होत आहे.
शेतकऱ्यांनी गायी खाली आणून उपचार करावेत
ज्या शेतकऱ्यांनी गडावर गायी सोडल्या आहेत. त्यांनी आपल्या गायी गडावरून खाली आणून त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत. तसेच ज्या गायींना अद्याप आजाराची लागण झाली नाही, अशा गायींना लसीकरण करून दक्षता घ्यावी. - निर्मला जिरगे, सरपंच, हजारमाची, सदाशिवगड
दवाखाण्यात आणल्यास उपचार करणार
संबंधि गायींची तपासणी करणे गरजेचे आहे, गडावर सोयी सुविधा नसल्याने आजारग्रस्त गायींची तपासणी व उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा गायी दवाखान्यात आणल्यास त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे उपचार करण्यात येतील. - राहुल धोंगडे, पशुधन विकास अधिकारी