For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोकेदुखी : काँग्रेसला हिजाबची तर भाजपला स्वकियाची

06:30 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
डोकेदुखी   काँग्रेसला हिजाबची तर भाजपला स्वकियाची
Advertisement

भाजपच्या राजवटीत कर्नाटकातील शिक्षण संस्थात हिजाबला बंदी घालण्यात आली होती. आता हिजाबबंदी उठविण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. या घोषणेला विरोध वाढताच केवळ एका दिवसात आपल्या भूमिकेत बदल करून अद्याप आदेश दिला नाही, तसा विचार सुरू आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. खरेतर आधीच अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या भाजपकडे सरकारविरुद्ध कसलेच अस्त्र नव्हते. हिजाबबंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर भाजप व हिंदू संघटना सरकारवर तुटून पडल्या आहेत. हा विषयच अद्याप न्यायप्रविष्ट आहे. म्हैसूर येथील एका कार्यक्रमात गेल्या शुक्रवारी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्यांनी हिजाबबंदी उठविण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विजयासाठी काय करता येईल, याची व्यूहरचनाही राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत नाजूक विषयाला हात घालून मुख्यमंत्र्यांनी नसता वाद आपल्यावर अंगावर ओढून घेतला आहे.

Advertisement

‘तुम्ही हिजाबवरील बंदी उठवलात तर आम्ही भगवी शाल परिधान करून आपल्या मुलांना शाळा-कॉलेजला पाठविणार’ अशी भूमिका भाजप व हिंदू संघटनांनी घेतली आहे. सरकारविरुद्ध विरोधी पक्ष या संघर्षात शिक्षण क्षेत्रावर परिणाम होणार आहे. भाजपच्या राजवटीत हा निर्णय झाला, त्याचवेळी केवळ राज्य व देशातच नव्हे तर परदेशातही हा ठळक चर्चेचा मुद्दा बनला होता. न्यायप्रविष्ट विषय उकरून काढून मुख्यमंत्र्यांनी नसता वाद अंगावर ओढून घेतला आहे. यावर ‘हिंमत असेल तर हिजाबबंदी उठवाच’ असे आव्हान भाजपने दिले आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. दुसरीकडे भाजपने संघटना बळकट करण्याचे काम सुरू केले आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बेंगळूर येथे नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पक्षाचे उपाध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करताना विजयेंद्र यांनी आपली पकड कायम ठेवली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी कोट श्रीनिवास पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षाच्या उपनेतेपदी अरविंद बेल्लद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील वल्ल्यापुरे, एन. रवीकुमार यांचीही परिषदेतील उपनेता व मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर पुरते भडकले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या भाजप नेत्यांना बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचे स्वकियांविरुद्धची प्रक्षोभक वक्तव्ये, गंभीर स्वरुपाचे आरोप डोकेदुखीचे ठरू लागले आहेत. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात 40 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप बसनगौडा यांनी केला आहे. आपल्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी निशाणा बनविला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. या मुद्द्यावर तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना लक्ष्य बनविले आहे.

Advertisement

तुमच्याच पक्षाच्या आमदाराने कोरोनाच्या काळात 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचारात ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’ असे सांगणाऱ्या भाजप नेत्यांचा वाटा किती आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी बसनगौडा पाटील-यत्नाळ दिल्लीला गेले होते. कर्नाटकातील पक्षांतर्गत संघर्षावर दिल्लीत तोडगा निघणार, अशी अटकळ होती. मात्र, ही अटकळ खोटी ठरली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैऱ्याच सुरू केल्या आहेत. हवेतर मला नोटीस द्या, पक्षातून माझी हकालपट्टी करा, त्यानंतर कोण काय आहेत? हे लोकांसमोर उघड करतो, असे आव्हानच बसनगौडा यांनी आपल्याच पक्षाला नेतृत्वाला दिले आहे. बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही या आरोपांचे पडसाद उमटले. पक्षाच्या हायकमांडने बेताल आरोप करणाऱ्या बसनगौडा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचे काय करायचे, ते पक्षाचे नेते ठरवतात, असे सांगत नूतन अध्यक्षांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. बसनगौडा यांचे कट्टर राजकीय विरोधक मुरगेश निराणी यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे बसनगौडा यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे. हा खेळ असाच सुरू राहिल्यास एकतर पक्षाच्या हायकमांडकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. नहून ते स्वत:च वेगळी वाट चोखळण्याचे अंदाज आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबा, पुढे काय होते? ते पहा, असे सांगत बसनगौडा यांनी पक्षांतर्गत वाद संपणार नाही, ते चालूच राहणार आहेत, याचेच सूतोवाच केले आहे.

सत्ता हाती आल्यानंतर नेत्यांचा ताळतंत्र सुटतो. सत्ता येईपर्यंत शेतकरी, कष्टकरी या नेत्यांना मायबाप वाटत असतात. एकदा खुर्ची मिळाली की त्यांचा वागण्या-बोलण्याचा थाटच बदलतो. सध्या साखरमंत्री शिवानंद पाटील यांचेही तसेच झाले आहे. अथणी तालुक्यातील सुटट्टी येथील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी दुष्काळाची वाट पहात असतात, असे त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यात मंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. शिवानंद पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक व निजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे. या मुद्द्यावर वाद तापताच आपण तसे बोलले नाही, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी सारवासारव केली आहे. कष्टाने पिकविलेल्या पिकाला चांगला भाव मिळाला तर कर्जमाफीची अपेक्षा कोण करणार आहे? कर्जमाफीसाठी राज्यात दुष्काळ पडावा, अशी आशा कोणी बाळगतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवानंद पाटील स्वत: शेतकरी आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. राज्यभर शेतकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन छेडल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना शेतकऱ्यांविषयी आदराने बोलण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement
Tags :

.