द्विशतकी भागीदारीसह हेड, स्मिथ यांची शतके
बुमराहचे पाच बळी, कॅरे नाबाद 45, ऑस्ट्रेलिया 7 बाद 405
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
टॅव्हिस हेडने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत नोंदवलेले सलग दुसरे शतक आणि दीर्घ काळानंतर सूर गवसलेल्या स्टीव्ह स्मिथसमवेत त्याने नोंदवलेली द्विशतकी भागीदारी यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 7 बाद 405 धावा जमवित भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. स्मिथने 33 वे कसोटी शतक नोंदवत ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक शतके नोंदवणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान मिळविले. भारतातर्फे जसप्रित बुमराहने 5 बळी टिपत कपिलदेवला सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याच्या बाबतीत मागे टाकले.
पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला होता. त्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने बिनबाद 28 धावा जमविल्या होत्या. बुमराह व रे•ाr यांनी दुसऱ्या दिवसाच्या प्रारंभी भेदक व प्रभावी मारा करीत 3 बाद 75 अशी ऑस्ट़ेलियाची स्थिती केली होती. पण यानंतर स्मिथ व हेड यांनी दमदार फलंदाजी करीत चौथ्या गड्यासाठी 241 धावांची भागीदारी करून यजमानांचा डाव सावरत वर्चस्वही मिळवून दिले. हेडने 160 चेंडूत वादळी खेळी करीत 18 चौकारांच्या मदतीने 152 धावा फटकावल्या तर स्मिथने त्याला चांगली साथ देत 190 चेंडूत 12 चौकारांसह 101 धावा जमविल्या.
सुरुवातीस वर्चस्व मिळविलेल्या भारतीय गोलंदाजांची नंतर पकड सैल झाली आणि त्याचा लाभ हेड व स्मिथ यांनी उठविला. विशेषत: हेड जास्त आक्रमक होता. त्याचे हे भारताविरुद्धचे चौथे व सलग दुसरे शतक आहे. याआधी त्याने दुसऱ्या कसोटीतही जोरदार शतक (140) नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. बुमराहने सकाळच्या सत्रात व दिवसाच्या अखेरीस बळी टिपले. या मालिकेत त्याने दुसऱ्यांदा पाच बळींचा टप्पा गाठला. त्याने एकूण 17 वेळा पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविले आहेत.
स्मिथने 25 डावांच्या प्रतीक्षेनंतर शानदार शतकी खेळी करीत टीकाकारांची तोंडे बंद केली. भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके नोंदवणाऱ्यांत स्मिथने इंग्लंडच्या जो रूटसह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले. दोघांनीही प्रत्येकी 10 कसोटी शतके नोंदवली आहेत. याशिवाय विंडीजच्या रिचर्ड्स व सर गारफिल्ड सोबर्स यांनी प्रत्येकी 8 शतके भारताविरुद्ध नोंदवली आहेत.
हेड भारताच्या मार्गातील मोठा अडथळा
2023 मधील डब्ल्यूटीसी अंतिम लढतीपासून हेड भारताच्या मार्गातील मोठा अडथळा ठरत आला आहे. त्यानंतर त्याने वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीतही दर्जेदार शतक नोंदवत भारताला जेतेपदापासून वंचित ठेवले तर या मालिकेत त्याने दोन शतके नोंदवली आहेत. विविध फॉरमॅटमध्ये मिळून गेल्या वर्षभरात भारताविरुद्ध त्याच्याइतक्या धावा अन्य कोणत्याही फलंदाजाला जमविता आलेल्या नाहीत.
भारताकडून काही डावपेचात्मक चुकाही झाल्या, त्याचा लाभ हेडला मिळाला. फलंदाजीच्या सुरुवातीस डीप पॉईंट व डीप स्क्वेअरलेगमध्ये क्षेत्ररक्षक ठेवल्याने कट्स व लेगकडे चेंडू ढकलत हेडला एकेरी- दुहेरी धावा घेत डावाचा वेग वाढवता आला. तो चांगला सेट झाल्यानंतर उसळत्या चेंडूंचा त्याच्यावर प्रयोग करण्यात आला. पण त्याने ते जोरात फटकावत धावा वसूल केल्या. रोहितने त्याच्या रॅम्प शॉटसाठी थर्डमॅन ठेवला नव्हता, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. चहापानानंतरही भारताने भरपूर धावा दिल्या. जडेजाने 16 षटकांत 76 तर नितीश रेड्डी ने 13 षटकांत 65 धावा दिल्या. नवा चेंडू घेणार असल्याने रोहित आघाडीच्या वेगवान गोलंदाजांना राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता.
स्मिथचे शतकही दर्जेदार होते. पहिल्या टप्प्यात त्याने संयमी खेळ केला. पण नजर स्थिरावल्यानंतर त्याने आपले स्ट्रोक्स खेळण्यास सुरुवात केली. सलग तिसऱ्या कसोटीत त्याने आपल्या स्टान्समध्ये बदल करताना पहिल्यासारखा अॅक्रॉस शफल होत खेळ केला आणि त्याचा त्याला फायदाही झाला. सकाळच्या सत्रात उस्मान ख्वाजा चौथ्या षटकात 21 धावांवर बाद झाला. बुमराहने आपल्या पुढच्या षटकांत मॅकस्वीनीला 9 धावांवर बाद केले. तीन कसोटीत चौथ्यांदा बुमराहने त्याला बाद केले आहे. आकाश दीप व सिराज यांनी स्मिथ व लाबुशेन यांच्यावर दडपण आणले होते. पण रे•ाrने लाबुशेनला 12 धावांवर माघारी पाठवले. याशिवाय मार्शने 5, कमिन्सने 20 धावा केल्या तर कॅरे 45 व स्टार्क 7 धावांवर दिवसअखेर खेळत होते.
या सामन्याच्या पुढील तीन दिवशीही पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले असून त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 101 षटकांत7 बाद 405 : उस्मान ख्वाजा 54 चेंडूत 21, मॅकस्वीनी 49 चेंडूत 9, लाबुशेन 55 चेंडूत 12, स्मिथ 190 चेंडूत 12 चौकारांसह 101, ट्रॅव्हिस हेड 160 चेंडूत 18 चौकारांसह 152, मिचेल मार्श 16 चेंडूत 5, अॅलेक्स कॅरे खेळत आहे 47 चेंडूत 45, कमिन्स 20, स्टार्क खेळत आहे 7, अवांतर 33. गोलंदाजी : बुमराह 5-72, सिराज 1-97, रे•ाr 1-65.