For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो परिपूर्ण ब्रह्म असतो तो देहत्याग करताना घाबरत नाही

06:30 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो परिपूर्ण ब्रह्म असतो तो देहत्याग करताना घाबरत नाही
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

भगवंतांनी केलेल्या उपदेशामुळे, दारूकाच्या लक्षात आले की, त्याच्यातच श्रीकृष्ण वसलेला आहे. त्यामुळे तो आणि कृष्ण वेगळे नसून तो स्वत:च कृष्णरुप आहे. म्हणून तोही परिपूर्ण ब्रह्म आहे. श्रीकृष्णाचे उपदेशाचे बोल ऐकून दारूकाला संतोष वाटला. श्रीकृष्ण कुणी वेगळा नसून तो त्याच्यातच वसलेला आहे अशी त्याची खात्री झाली. त्यामुळे त्याला सोडून श्रीकृष्ण निजधामाला निघाला आहे अशी त्याची झालेली गैरसमजूत नष्ट झाली. त्याच्या मनातील खेद नाहीसा होऊन त्याने श्रीकृष्णाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांना तीनवेळा प्रदक्षिणा घातली आणि वारंवार त्यांना नमस्कार करू लागला. त्यांच्या पायावर डोके ठेऊन, द्वारकेला जाण्यासाठी त्यांची परवानगी घेतली. ज्या श्रीकृष्णाने ब्रह्म सर्वत्र पूर्णपणे भरलेले आहे असा आपल्याला उपदेश केला तो आता निजधामाला जाणार असल्याने, आता हे सगुण, साकार रूप आपल्या नजरेसमोरून कायमचे नाहीसे होणार म्हणून दारूकाला अतिशय वाईट वाटत होते. ह्याच्यापुढे आपल्याला कधीही श्रीकृष्ण दर्शन होणार नाही ह्या कल्पनेने अतिशय दु:खी अंत:करणाने तो द्वारकेकडे निघाला. दारूकाला द्वारकेला पाठवून दिल्यावर श्रीकृष्णापाशी मैत्रेय आला. त्यालाही श्रीकृष्णांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ह्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश तू विदुरांना कर असे त्यांनी मैत्रेयाला सांगितले. श्रीकृष्णाचे निर्वाण पाहण्यासाठी उद्धव तेथे गुप्तपणे हजर होता. त्यानेही भगवंतांनी दारूक आणि मैत्रेयाला केलेला ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकला होता. तो ऐकून त्याला अतिशय संतोष वाटला. तो त्यांना वंदन करून बद्रीकाश्रमात जाण्यासाठी निघाला. भगवंतांनी दारूकाला द्वारकेला धाडले, मैत्रेयाला त्याच्या आश्रमात पाठवले. उद्धवाला बद्रीला जा म्हणून सांगितले आणि व्याधासारख्या अधमाला स्वर्गात पाठवून दिले. अशाप्रकारे त्यांनी सर्व निरवानिरव केली. तसेच स्वत:च्या रथासह घोडे, आयुधे पुढे पाठवून दिली. आता ते स्वत:ही निजधामाकडे जाण्यास निघतील. तो एक मोठ्ठा सोहोळाच असेल. तो निजधामाला जात असल्याचे पाहण्यासाठी समस्त देवगण येतील. ते सुरस कथानक आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. ते सर्व कथानक अत्यंत श्रवणीय आहे. मुळातच परमेश्वराला जन्मही नसतो आणि मृत्यूही नसतो परंतु अवतार घेतल्यावर आजन्म असलेला परमेश्वर जन्माला येतो. परमेश्वर विदेही असतो परंतु अवतारकाळात तो देहासह वावरतो. जन्म घेण्याबरोबरच तो देह धारण करतो आणि विशेष म्हणजे स्वत: अक्षय असलेला परमेश्वर स्वत:चा मृत्यूही घडवून आणतो. हे सर्व घडवून आणणारा श्रीकृष्ण अतिलाघवी आहे. त्याचे हे सगळे कौशल्य पाहून मन आश्चर्यचकीत होते. त्यांचे निजधामाला जाणे हे शिव आणि ब्रह्मदेवाच्या तर्काच्या पलीकडचे आहे. ते सर्व सविस्तरपणे पुढील अध्यायात सांगितले जाईल. श्रीकृष्णांचे निजधामाला जाण्याचा प्रसंग हा एकादश स्कंधाचा कळस आहे असं म्हंटलं तरी चालेल. ज्याचा देहाभिमान गळून पडलेला असतो तो परिपूर्ण ब्रह्म होतो. भगवंतांच्या ठिकाणी देहाभिमान नसल्याने ते परिपूर्ण ब्रह्म होते. जो परिपूर्ण ब्रह्म झालेला असतो त्याला सर्वत्र ब्रह्माच्या उपस्थितीचा अनुभव येत असल्याने त्याला कशाचीही भीती वाटत नसते. तो आपल्या मनाने इथे जन्म घेत असतो आणि देहात राहून ठरवलेले कार्य करत असतो आणि ते समाप्त झाल्यानंतर देहत्याग करत असतो. सर्वसामान्य माणसाला मरणाचे भय वाटत असते किंबहुना माणसाला सर्वाधिक भय मरणाचेच वाटत असते. म्हणून देहत्याग करताना न घाबरता आपण परिपूर्ण ब्रह्म कसे आहोत हे श्रीकृष्ण दाखवून देणार आहेत. पुढील अध्यायात भगवंतांच्या महानिर्वाणाचे सविस्तर वर्णन येणार आहे. ह्या ठिकाणी ‘स्वकुलनिर्दळणं’ नावाचा तिसावा अध्याय समाप्त.

Advertisement
Advertisement
Tags :

.