कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्याला भोगांची अपूर्वाई नसते त्याला परम शांती प्राप्त होते

06:30 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, सामान्य मनुष्य इंद्रियांच्या आहारी गेलेला असतो तर स्थितप्रज्ञ पुरुष प्रथम इंद्रिये सुचवत असलेल्या वैषयिक आकर्षणाकडे दुर्लक्ष करतो. इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवून त्यांनी कोणती प्रलोभने दाखवायची, कोणती नाहीत हे ठरवतो आणि त्याबरहुकूम ती काम करतात. त्यामुळे त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते. जीवनात याहुन मोठे मिळवावयाचे असे काहीच नाही.

Advertisement

ज्याप्रमाणे कासव संकटकाळी आपले अवयव आवरून घेते त्याप्रमाणे ज्याला योग्यवेळी ज्ञानेद्रिंयांना ताब्यात ठेवण्याची युक्ती साधलेली असते त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. तसेच तो सिद्धींच्या प्रलोभनांनाही बळी पडत नाही मात्र लोककल्याणासाठी त्यांचा वापर अवश्य करतो. इंद्रियांची संपूर्ण स्वाधीनता साधणे सामान्य मनुष्याला लगेच शक्य होण्यासारखे नाही कारण त्यासाठी स्थितप्रज्ञ व्हायला हवे परंतु त्याने धोक्याची जाणीव झाल्यावर तरी सावध होऊन कासवाप्रमाणे आपल्या इच्छा, वासना आवरून धरल्या पाहिजेत.

पुढील श्लोकात स्थिरबुद्धी माणसाचे आणखी एक लक्षण सांगताना भगवंत म्हणतात, सर्व भूतमात्रांची जेव्हा रात्र असते, त्यावेळी संयमी पुरुष जागा असतो व ज्या ठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात त्यावेळी ज्ञानवान मुनि निद्रेत असतात.

सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे । सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ।।69।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सर्व प्राणीमात्रास आत्मस्वरूपाचे ज्ञान नसल्याने ते त्याबाबतीत अजाण असतात. झोपलेल्या माणसाला आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नसते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे भान नसलेली व्यक्ती त्या बाबतीत निजलेली असते असे समजावे. त्याचवेळी स्थिरबुद्धि पुरूष मात्र आत्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान असल्याने जागा असतो. त्याउलट जेव्हा विषयसुखाच्या प्राप्तीसाठी लोक सजग असतात, त्यावेळी विषयसुखाची बिलकुल ओढ नसलेला स्थिरबुद्धी पुरुष मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे निद्रेत असतो.

प्रारब्धानुसार वाट्याला आलेले भोग भोगण्याच्यावेळी संयमी पुरुष जागरूक असतो. त्यामुळे तो त्यात वाहवत जात नाही. जनक महाराज आत्मज्ञानी होते. त्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार राज्य आणि सुखोपभोग मिळाले होते परंतु ते भोगताना हे आणखीन मिळावेत किंवा आहेत तसेच रहावेत असे कधी त्यांना वाटले नाही. मिळतंय तोवर भोग भोगावेत ज्या दिवशी नसतील त्या दिवशी वाईट वाटून घेऊ नये अशी त्यांची मनोवृत्ती

होती.

भगवंतानी गीतेच्या तिसऱ्या अध्यायात जनकमहाराजांचा आदराने उल्लेख केलेला आहे. भोग भोगावयास मिळावेत म्हणून सामान्य माणूस खटपटीत असतो परंतु ज्ञानी मात्र अशी कोणतीही खटपट करत नसल्याने निद्रेत असल्याप्रमाणे स्वस्थ बसलेला असतो.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्रात, सर्व बाजुंनी पाणी येत असतानाही तो आपली मर्यादा सोडत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषाला भोगांची अपूर्वाई नसते त्याला परमशांती प्राप्त होते.

न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी ? जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ।।70।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, समुद्राचे ठिकाणी जशी अखंड स्थिरता असते, तशी स्थिरता या पुरूषाचे ठायी असते.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article