कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आम्ही उठलो तेव्हाच सरकारला जाग आली

07:23 AM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांची टीका

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

आम्ही उठलो तेव्हाच सरकारला जाग आली व स्वत:चे अपयश लपविण्यासाठी आणि लोकांचा रोष टाळण्यासाठी त्यांचेच पदाधिकारी, सहकारी, एकमेकांवर दोषारोप करू लागले. अन्यथा हे सरकार म्हणजे बनाना रिपब्लिक बनले होते, अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातर्फे हल्लीच राबविण्यात आलेल्या मतदारसंघनिहाय जनसंपर्क मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान राज्यभरातील लोकांचे प्रश्न, समस्या, तक्रारी, मागण्या, ऐकण्याची संधी मिळाली व आपण त्या उद्यापासून सुरू होणाऱ्या 15 दिवशीय अधिवेशनात मांडण्याचे प्रयत्न करणार आहे, असे सरदेसाई यांनी पुढे सांगितले. या अधिवेशनासाठी आपण 25 तारांकित आणि 225 अतारांकित प्रश्न सादर केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पेडणे मतदारसंघातून या मोहिमेची सुऊवात करण्यात आली होती. त्यानंतर बार्देश, म्हापसा, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, वास्को, काणकोण, फोंडा, सासष्टी, आदी मतदारसंघांना भेटी देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी लोकांनी खुलेपणाने समस्या मांडल्या. त्यावरून राज्याचे प्रशासन पूर्णत: कोलमडले असून हे सरकार लोकांची नाडी ओळखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे, कुणाचे कुणावर नियंत्रण नाही, वरिष्ठ अधिकारी हुकुमशाहासारखे वागत असून केवळ मंत्र्यांची तळी उचलण्यात धन्यता मानत आहेत, बेरोजगारी-गुन्हेगारी वाढली आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामेच होत नसल्याने सर्वत्र प्रचंड नाराजी पसरली आहे, परिणामी लोक या सरकारवर प्रचंड नाराज, संतप्त असल्याचे एकुण चित्र पाहण्यास मिळाले, असे सरदेसाई यांनी सांगितले.

अशाप्रकारे आम्हाला मिळत असलेला लोकांचा प्रतिसाद पाहून आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यातून त्यांचेच प्रतिनिधी, पदाधिकारीसुद्धा सरकारवर दोषारोप करू लागले आहेत. यावरून अंतर्गत धुसफूस वाढली असल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला.

दरम्यान, लोकांना ज्या विश्वासाने आणि खुल्या दिलाने आमच्याशी संवाद साधला, तक्रारी, समस्या मांडल्या त्या सर्वांना विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून शक्य तेवढा न्याय देण्याचे आपण प्रयत्न करणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. तरीही विधानसभेत संधी मिळालीच नाही तर अधिवेशनानंतर पुन्हा एकदा याच पद्धतीने लोकांमध्ये जाऊन वैयक्तिक पातळीवर त्यांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article