दुष्काळी मदतनिधीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचीही घेतली भेट
18,177 कोटी मंजूर करण्याची सिद्धरामय्यांची अमित शहांकडे विनंती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील दुष्काळ निवारण कामांसाठी केंद्राकडून मदतनिधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बुधवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्याला तातडीने 18,177.44 कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात तीव्र दुष्काळ असून राज्याला मदतनिधी मिळवून देण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन मदत जाहीर करण्याची विनंती केली. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा देखील उपस्थित होते.
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून एकूण 236 तालुक्यांपैकी 223 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. तसेच सुमारे 48.19 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्र सरकारने दुष्काळी मदतनिधी जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारने एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दुष्काळी मदतीसाठीचा प्रस्ताव सादर करून तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप निधी देण्यात आलेला नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. इनपुट सबसिडीअंतर्गत 4663.12 कोटी रुपये, आपत्कालीन मदत म्हणून 12,577.86 कोटी रुपये, पिण्याच्या पाण्यासाठी 567.78 कोटी रुपये, पशूसंवर्धनासाठी 363.68 कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंती सिद्धरामय्यांनी अमित शहा यांच्याकडे केली.
केंद्राच्या दुष्काळी अध्ययन पथकाने 4 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून भौतिक स्थितीविषयीचा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आणखी 27 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. त्यामुळे एनडीआरएफ अंतर्गत 17901.73 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. यामध्ये 12,577.86 कोटी रुपयांच्या आपत्कालीन मदतीचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.