एचडीएफसी, आयटीसी-टाटा मोटर्सच्या घसरणीचा फटका
दिवसअखेर सेन्सेक्स 693 तर निफ्टी 208 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी ब्लू-चिप समभागांनी एचडीएफसी बँक, आयटीसी, टाटा मोटर्स व स्टेट बँक यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण राहिल्याने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांक जवळपास 700 अंकांनी घसरुन 79,000च्या दरम्यान खालची पातळी गाठली आहे. ज्यामुळे बाजाराला सलग दुसऱ्या दिवशी तोटा वाढला आहे. यासह जागातिक पातळीवरील बाजारांमधील मिळता-जुळता कल यामुळेही देशातील बाजारांची देशा बदलून गेली होती.
30 मुख्य समभाग असणाऱ्या बीएसई सेन्सेक्सने 692.89 अंकांसह 0.87 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 78,956.03 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 208.00 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 24,139.00 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्समधील पहिल्या 30 समभागांमधील 6 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यात टायटन, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, सनफार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग पहिल्या पाच मध्ये वधारण्यात राहिले आहेत. यासह महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभागही लाभात राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये 30 मधील 24 समभाग हे घसरणीत राहिले. यामध्ये एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि स्टेट बँक, हे घसरणीत पहिल्या पाच कंपन्यांमध्ये राहिले आहेत. याबरोबरच एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, लार्सन अॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, एचसीएल, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, कोटक बँक, मारुती, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती :
जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ शांघाय आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. तर युरोपीयन बाजार तेजीसह बंद झाले आहेत. तसेच शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पुन्हा एकदा विक्री केली आहे. त्यांनी एका दिवसात जवळपास 4,680.51 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केल्याची नोंद आहे.