एचडीएफसी बँकेच्या नफ्यात 34 टक्क्यांनी वाढ
कंपनीने कमावले 16 हजार कोटीहून अधिक
नवी दिल्ली :
भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीने आर्थिक वर्ष 2024च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, वर्ष-दर-वर्षच्या दराने 34 टक्के वाढीसह 16,373 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एचडीएफसी बँकेचा हा निव्वळ नफा विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा चांगला होता.
उपलब्ध आकडेवारीनुसार विश्लेषकांनी 15,651 कोटी रुपये निव्वळ नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता. मागील तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 15,976 कोटी रुपये होता. जुलै 2023 मध्ये एचडीएफसी बँकेचे एचडीएफसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतरचा हा दुसरा निकाल आहे. मागील वर्षी याच कालावधीत एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाले नसल्याने, मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता येणार नाही.
एनपीए वाढला
एचडीएफसी बँकेची सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (जीएनपीए) डिसेंबर तिमाहीत 1.26 टक्क्यांपर्यंत वाढली, जी सप्टेंबरच्या तिमाहीत 1.34 टक्के होती. गेल्या वर्षी याच कालावधीत 1.23 टक्के होते.
व्याज उत्पन्नात वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक 24 टक्क्यांनी वाढून 28,471 कोटी रुपयांवर पोहचले आहे.