हॅजलवूड अॅशेस मालिकेतून बाहेर
कर्णधार कमिन्स पुनरागमनाच्या तयारीत
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेत आता उर्वरित तीन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज स्नायु दुखापतीमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही. तर दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीत खेळण्याची संधी न मिळालेला नियमीत कर्णधार पॅट कमिन्स पुनरागमनच्या तयारीत आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाने पर्थ आणि ब्रिस्बेन येथील कसोटी सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. दरम्यान या पहिल्या दोन कसोटीत हॅजलवूडचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश नव्हता. या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यात तो खेळेल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. हॅजलवूडची स्नायु दुखापत पूर्णपणे बरी झाली नसून त्याला संपूर्ण अॅशेस मालिकेला मुकावे लागणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पुढील वर्षीच्या प्रारंभी भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅजलवूडचे पुनरागमन होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांच्या पथकामध्ये हॅजलवूडचा नियमीत समावेश राहीला आहे.
दरम्यान पॅड कमिन्स तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मालिकेतील तिसरी कसोटी अॅडलेड येथे 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पाठदुखापतीच्या समस्येतून कमिन्स आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. या दुखापतीमुळेच 32 वर्षीय कमिन्सला या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत खेळता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले होते. या मालिकेतील जीवंत ठेवण्यासाठी स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाला अॅडलेडची तिसरी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. या मालिकेतील चौथी कसोटी बॉक्सिंग डे दिवशी मेलबोर्न येथे सुरू होईल तर पाचवी आणि शेवटची कसोटी 4 जानेवारीपासून सिडनीत सुरू होईल. 2010-11 नंतर इंग्लंड संघाला अॅशेस मालिका जिंकता आलेली नाही. चालु अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात मिचेल स्टार्कचा वेगवान मारा परिणामकारक ठरला. त्याने या दोन कसोटीत 18 गडी बाद करुन पाठोपाठ सामनावीराचा बहुमान मिळविला आहे.