विवाहासाठी चोरावी लागते दुसऱ्याची पत्नी
आदिवासी समुदाय स्वत:च्या परंपरा, राहणीमान आणि खानपानासाठी जगभरात ओळखला जातो. विवाहावरून प्रत्येक ठिकाणी स्वत:च्या मान्यता आहेत आणि प्रथा-परंपरा आहेत. पश्चिम आफ्रिकेत एक असा समुदाय राहतो, जो विचित्र परंपरेचे पालन करतो. या समुदायात विवाह करण्यासाठी अन्य कुणाची पत्नी चोरावी लागते. येथे परंपरेमुळे लोक परस्परांच्या पत्नींना चोरून नेत विवाह करत असतात. पश्चिम आफ्रिकेत राहणाऱ्या या समुदायाचे नाव वोदाब्बे असून या समुदायाचे लोक परस्परांच्या पत्नींना चोरून नेत विवाह करतात. अशाप्रकारचा विवाह हा या समुदायाच्या लोकांची ओळख आहे.
या समुदायाचे लोक पहिला विवाह स्वत:च्या परिवाराच्या मर्जीने करतात, परंतु दुसऱ्या विवाहासाठी प्रथा काहीशी वेगळी आहे. या समुदायात दुसऱ्या विवाहासाठी दुसऱ्याची पत्नी चोरणे आवश्यक आहे. याशिवाय दुसरा विवाह करण्याचा अधिकार देखील मिळत नाही. या समुदायाकडून दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या आयोजनादरम्यान युवक सजून स्वत:च्या चेहऱ्यावर रंग लावून घेतात. यानंतर सामूहिक आयोजनात नृत्य आणि अनेक प्रकारच्या कृत्यांद्वारे इतरांच्या पत्नींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर एखादी महिला परक्या पुरुषाबरोबर पळून गेल्यास समुदायाचे लोक दोघांना शोधून त्यांचा विवाह लावून देतात. या दुसऱ्या विवाहाला प्रेमविवाह म्हणून स्वीकारले जाते.