२२ वर्षांपासून हटविला नाही मेकअप
स्थिती बिघडल्याने घेतली डॉक्टरकडे धाव
चीनच्या जिलिन येथील एका 37 वर्षीय महिलेने आपण दोन दशकांपासून मेकअप योग्यप्रकारे हटविला नव्हता, असा खुलासा केला आहे. यामुळे या महिलेच्या चेहऱ्यावर फोड आले असून पूर्ण चेहरा लाल झाला आहे. गाओ नावाच्या महिलेने चिनी सोशल मीडियावर स्वत:ची कहाणी शेअर केली आहे. मेकअप लावल्यावर नियमित स्वरुपात मी चेहरा साफ करत नव्हते. सुमारे 20 वर्षांपासून चेहऱ्यावरून मेकअप पूर्णपणे उतरविला नव्हता. यामुळे आता मला गंभीर अॅलर्जीला तोंड द्यावे लागत आहे. माझा पूर्ण चेहरा सुजला असल्याचे गाओने सांगितले.
मी किशोरावस्थेपासूनच स्वत:च्या आईच्या लिपस्टिकमुळे मोहित झाली होती आणि वयाच्या 15 व्या वर्षी मी मेकअप करण्यास सुरुवात केली होती. मेकअप हटविणे मला अत्यंत त्रासदायक वाटायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा मेकअप करायचा असल्याने तो हटविण्याची काय गरज, असे माझे मानणे होते असे गाओ यांनी सांगितले.
कधीच योग्यप्रकारे हटविला नाही मेकअप
याचमुळे मी झोपण्यापूर्वी केवळ पाण्याने चेहरा धुवत होती आणि दुसऱ्या दिवशी आणखी मेकअप लावायचे. परंतु मी अनेक वर्षांपासून फोडांना तोंड देत होते. तरीही चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत माझी त्वचा अपेक्षाकृत चांगल्या स्थितीत होती. परंतु आता एक गंभीर अॅलर्जी झाली, यामुळे माझा चेहरा सुजून गेला असून तो आता ओळखता येत नसल्याचे गाओने म्हटले.
कुठल्याही त्वचातज्ञाकडे न जाता मी एका मेडिकल एस्थेटिक्स क्लिनिकमध्ये स्किन बूस्टर इंजेक्शन टोचून घ्यायला गेली. त्यामुळे त्वचा गडद जांभळ्या रंगाची झाली आणि स्थिती अधिक बिघडल्याने असह्या खाज सुटू लागली. आता मला घराबाहेर पडण्याची हिंमत होत नाही. पूर्ण चेहरा आता कोमेजून गेला असल्याचे तिने म्हटले आहे.
स्वस्त फौंडेशन अन् मेकअप
साधारण परिवारात वाढलेली गाओ कधीकधी स्वस्त फौंडेशनचा वापर करायची. याचमुळे ही स्थिती झाल्याचा तिला संशय आहे. मेकअप तिच्या लक्षणांचे कारण असू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच तिला रोसैसिया आणि डर्मेटायटिसचा त्रास असल्याचे काही जणांचे मानणे आहे.