सत्ताधीशांना ‘उधारी’ देणारी हवेली
आपल्या देशात अशा अनेक वास्तू आहेत, की ज्यांचे काही ना काही ऐतिहासिक वैशिष्ट्या आहे. दिल्लीतील ‘चुन्नामल’ हवेली ही अशीच एक वास्तू आहे. इसवीसन 1864 मध्ये या वास्तूची निर्मिती झाली. तिचे वैशिष्ट्या असे, की येथे दिवसरात्र, राजा-महाराजा आणि सुलतान यांची रांग लागलेली असे. ही रांग ‘उधारी’ मागण्यासाठी लावली गेलेली असे. दिल्लीचा शेवटचा मोगल बादशहा बहादुरशहा जफर यांच्यावर हालाखीत राहण्याचे दिवस आले, तेव्हा, तोही याच हवेलीत ‘उधारी’ मागण्यासाठी आलेला होता, अशी या हवेलीची ख्याती आहे.
इतिहासकाळात राजे-महाराजे किंवा बादशाह राज्यकारभार चालविण्यासाठी किंवा युद्धासाठी सावकारांकडून कर्ज घेत असत. नंतर आपले अभियान आटोपल्यानंतर त्यातून जे उत्पन्न मिळेल त्यातून कर्जाची फेड करीत असत. चुन्नामल यांचाही अशा सत्ताधीशांना कर्ज देणे हा व्यवसाय होता. 1868 नंतरच्या बहुतेक सर्व सुलतानांनी किंवा बादशहांनी तसेच त्यांच्या सरदारांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले होते. तेव्हापासून प्रत्येक सुलतानाने किंवा धनिकाने या हवेलीतून काही लाक्षणिक कर्ज घेण्याची प्रथाच पडल्याचे दिसून येते. चुन्नामल यांचा त्यावेळच्या भारतभरात कापडाचा मोठ्या व्यापार होता. त्यातून त्यांनी प्रचंड पैसा कमावला आणि या पैशातून सावकारीचा व्यवसाय केला. तेव्हापासून अनेक ख्यातनाम लोकांनी या हवेलीतून ‘उधारी’ घेतली आहे. या हवेलीत एकेकाळी सोन्या-चांदीचा व्यापारही मोठ्या प्रमाणात चालत असे. जसे धान्याच्या दुकानात धान्य विकले जाते, तसे या वास्तूत एकेकाळी सोने आणि चांदी असे मौल्यवान धातू विकले जात अशी वदंता आहे. या वास्तूला जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आदींनीही भेट दिली आहे. आज उधारीचा व्यवसाय बंद असला तरी, या वास्तूचा परिचय तसाच आहे.