मित्रपक्ष नकोसे झाले की अडचणीचे?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू झालेली पळवापळवी असो किंवा नवाब मलिक यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीशी मुंबई महापालिकेत युती टाळण्याचा भाजपचा प्रयत्न असो यातून मित्र पक्ष आता नकोसे झालेत की अडचणीचे वाटू लागले आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपने जर कुबड्या सोडल्या तर काँग्रेससुध्दा त्याच वाटेने जाण्याची शक्यता आहे. पण, खरोखर या सर्वांनाच एकट्याने सध्याची वाटचाल शक्य आहे काय?
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या महायुतीतल्या अंतर्गत वादांचे सावट आहे. भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या युतीत सतत उफाळणाऱ्या तणावाचा नुकताच कडेलोट झाला. ठाणे जिह्यातील माजी नगरसेवकाच्या पुत्राला भाजपमध्ये घेण्यावरून शिंदे नाराज झाले आणि राज्यभरातील अशाच घटनांचा राग काढत शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला. त्यानंतर भेटीस गेलेल्या त्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुमानले नाही. सुरुवात कोण केली, आमचे लोक फोडले, आता वाईट का वाटते? हा मुख्यमंत्र्यांचा रोकडा सवाल होता. त्याचवेळी शिंदे यांचा आमदारांत फूट पडण्याची आणि ते एकगठ्ठा भाजपमध्ये जाण्याची चर्चा उठवली गेली. उखडलेले शिंदे यांनी मग थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली, पण या 50 मिनिटांच्या भेटीतून शिंदेंना कोणतीही दिलासा मिळाला नाही. उलट, भाजप आपल्या ‘विस्तार’ धोरणावर ठाम असल्याचे शिंदे यांनाही जाणवले असेल. पैसे देऊन आपले लोक फोडले जात आहेत हा शिंदे यांचा आरोप होता. पण बिहारच्या निवडणूक यशाबद्दल अभिनंदनास आपण शाह यांची भेट घेतली असे शिंदे यांना बाहेर सांगावे लागले. आता सर्वकाही आलबेल आहे असेही त्यांना एकतर्फी सांगावे लागू शकते. तसे झाले तरच राज्य भाजप आपल्या विस्ताराची गती थोडी कमी करेल. पण, कल्याण डोंबिवलीत रविंद्र चव्हाण, ठाण्यात गणेश नाईक, संजय केळकर आणि इतर मंडळींचा उपद्रव थांबेल असे वाटत नाही.
उपलब्ध माहितीनुसार शिंदे यांनी दिल्लीत शाह यांच्याशी जवळपास 50 मिनिटे चर्चा केली, ज्यात महाराष्ट्र भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात तक्रारी मांडल्या. शिंदे यांनी चव्हाण यांच्यावर शिवसेना नेत्यांना पैसे देऊ करुन फोडण्याचा आरोप केला, तर शाह यांनी शिंदेंना सांगितले की, पक्ष विस्तार करणे हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली गेली याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता शिंदेनी ‘मी अमित शाह यांची भेट तक्रारी सांगायला नाही, तर बिहारमधील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी घेतली. मी ‘बसून रडणारा’ माणूस नाही, मी लढणारा आहे,’ असे शिंदे यांनी नंतर मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले. पण, हे लढणे कुणाविरुद्ध? लढाई चव्हाण यांच्याशी आणि घाव फडणविसांचे आहेत. त्याबद्दल बोलणेही अवघड झाले आहे. भाजपनेते आता पत्रकारांना खासगीत शिंदेंना कोणीही जुमानत नाही हा संदेश देत आहेत. ‘शिंदे यांनी आपल्या नेत्यांना नियंत्रित करावे. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, लोक इच्छेनुसार इकडे येणारच. आम्ही विस्तार धोरण सोडणार नाही. सरकारमधील अंतर्गत मुद्दे राज्यपातळीवरच सोडवावे लागतील. दिल्ली आता त्यांना फार घोळणार नाही. भाजप 2029 च्या विधानसभा निवडणुकीत एकट्याने सत्ता मिळवण्याच्या दीर्घकालीन योजनेवर भर देत आहे.’ हे सगळे शिंदेंच्या पक्षाला निमूटपणे सहन करावे लागले आहे. असे सांगत आहेत. पण, दिल्ली शंभर टक्के ते म्हणताहेत तसेच वागत आहे असेही नाही. ते शिंदे यांना जपून वागवत आहेत. त्यांच्यासमोर देशाचे राजकारण आहे. पण, इथे जखमेवर विरोधकही मीठ चोळत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘शिंदे यांनी शिवसेना फोडून मुख्यमंत्रीपद मिळवले, आता भाजप त्यांना त्यांचीच औषधे द्यायला लागली आहे. शिंदे सेना लवकरच इतिहास जमा होईल,’ असे भाकीत केले. त्यांनी या वादाला ‘गँग वॉर’ संबोधले असून, फडणवीस शॅडो तर ‘खरे मुख्यमंत्री अमित शाह आहेत. सर्व निर्णय तिथेच होतात. सरकारने महाराष्ट्राचा आत्मसन्मान गहाणवट ठेवला आहे,’ असा दुधारी वार केला. तर उद्धव ठाकरे यांनीही शिंदेंवर वैयक्तिक टोला लगावला. ‘दिल्लीत जाऊन ‘बाबा, त्याने मला मारले’ म्हणून रडायची काय गरज? ही असहाय्यता का?’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी शिंदे गटावर सत्तेसाठी शिवसेनेच्या विचारसरणीला बळी घालण्याचा आरोप केला आणि महायुतीतील भागीदार एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रवत्ते क्लाईड क्रॅस्टो यांनीही बाहेर जा म्हणण्यापूर्वी शिंदेंनी सावध व्हावे अशी कळ काढली! महायुतीतील आणखी एक मुद्दा आहे अजित पवार गटाने नवाब मलिक यांची मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून केलेली नेमणूक. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. ‘नवाब मलिक हे आमचे समर्थक उमेदवार असू शकत नाहीत. जर मलिकचं नेतृत्व असेल तर मुंबईत युती होणार नाही,’ असे शेलार म्हणाले. मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात आरोप आहेत, जे 18 नोव्हेंबरला कोर्टाने फ्रेम केले. ही नेमणूक महायुतीतल्या तिसऱ्या भागीदाराशीही तणाव वाढवत आहे. यापूर्वी जमीन प्रकरणात पार्थ पवार यांच्या निमित्ताने अजित दादांच्या राष्ट्रवादीला चिमटीत पकडून सोडून देण्याचे काम भाजपने एकदा केले आहे. त्यांच्या पक्षातील विविध नेत्यांच्या मागे काही ना काही सातत्याने लागलेले दिसते. दरम्यान, शिंदे यांनी भेटीनंतर शिवसेना नेत्यांना ‘कोणताही क्रॉसओव्हर होणार नाही’ असा कडक आदेश दिला आहे. हे आदेश सर्व नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये परस्पर कार्यकर्ते न फोडण्याबाबत बोलणी झाल्याचेही सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ते शब्द राबवले जाण्याच्या रात्रीच मोडले गेले. महायुतीचा हा कलह स्थानिक निवडणुकांसाठी धोकादायक आहे. 2 डिसेंबरला 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, यात शिंदे यांचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेले वक्तव्य शिंदे सेनेला जिव्हारी लागल्याचे निदर्शक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये अपेक्षित आहेत. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असल्याने तिच्यावर सगळ्यांची नजर आहे. महायुतीतील तीन घटकही यावर वर्चस्व साधण्यासाठी धडपडत आहेत. विरोधी महाविकास आघाडीमध्येही तीव्र मतभेद आहेत. काँग्रेसने 15 नोव्हेंबरला मुंबईत 227 जागांवर स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुंबईत 150 जागांवर स्वतंत्र उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची शक्यता तग धरून आहे, पण काँग्रेसचा याला विरोध आहे. ठाकरे यांनी काँग्रेसला ‘स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे’ असे म्हटले. एकंदरीत, महाराष्ट्राचे राजकीय वातावरण बदलत चालले आहे. महायुतीत शिंदे गटाची भूमिका कमकुवत होत असल्याचे चित्र आहे, तर एमव्हीएतही एकजूट नव्हती. 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या कलहाचे पडसाद काय असतील, हे पाहणे रोचक असेल. परिणामी ताणायचे पण तुटू द्यायचे नाही असे सर्वांचे धोरण दिसते.
शिवराज काटकर