For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुताटकीयुक्त हॉटेल

06:48 AM Nov 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
भुताटकीयुक्त हॉटेल
Advertisement

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात डाउनटाउन लॉस एंजिलिसमध्ये एक ‘भुताटकीयुक्त हॉटेल’ असून याचे नाव ‘सेसिल’ आहे. याला जगातील सर्वात हॉन्टेड हॉटेल्सपैकी एक मानले जाते. भयावह म्हणून प्रसिद्ध हे हॉटेल सीरियल किलर्सना आश्रय देणे आणि अनेक रहस्यमय मृत्यूंसाठी कुख्यात आहे. अता हॉटेलसमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने अनेक दावे केले आहेत.

Advertisement

हॉटेल सेसिल भुताटकीयुक्त असल्याचा दावा करणारे पीट मोंटजिंगो हे यासंबंधीचे पुरावे जमा करत आहेत. ते पेशाने टिकटॉकर आणि युट्यूबर आहेत. मोंटजिंगो सेसिल हॉटेलसमोरील एका इमारतीत 2019 पासून राहत आहेत. त्यांनी स्वत:च्या बेडरुमच्या खिडकीतून हॉटेलमध्ये होणाऱ्या अनेक भीतीदायक घटनांना कॅमेऱ्यात रिकॉर्ड केले आहे. याचे व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

बहुतांश वेळेत मी अजब गोष्टी रिकॉर्ड केल्या आहेत. संबंधित हॉटेल 2017 पासून बंद होते, याचा अर्थ कुणीच तेथे राहू शकत नव्हते. मी कधीच कुणाला सेसिलच्या आत किंवा बाहेर पडताना पाहिले नाही. अजब सावल्या, मिणमिणता प्रकाश पाहिला असल्याचा दावा मोंटजिंगो यांनी केला आहे. हॉटेलमध्ये घडणाऱ्या घटनांना त्यांनी चित्रित करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Advertisement

भीतीदायक इतिहास

सेसिल हॉटेलला हॉरर हॉटेल देखील म्हटले जाते. याचा इतिहास अत्यंत भीतीदायक आहे. हे हॉटेल 1924 मध्ये सुरु करण्यात आले होते. गुन्ह्यांचा कुख्यात इतिहास, रहस्यमय मृत्यू आणि धोकादायक गेस्ट्ससोबत संबंध असल्याने हॉटेलला ‘अमेरिकेचे हॉटेल डेथ’ असे नाव पडले. हॉटेलमध्ये झालेल्या सर्वात गाजलेल्या घटनांमध्ये कॅनेडियन विद्यार्थिनी एलिसा लॅम बेपत्ता होणे आणि तिचा मृत्यू आहे. 2013 मध्ये एलिसा या हॉटेलमध्ये वास्तव्यास आली होती. एलिसाचा मृतदेह हॉटेलच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला होता. त्यावेळी या हॉटेलला स्टे ऑन मेन म्हटले जाते. या प्रकरणाने जगाला चकित करून सोडले होते. नंतर या घटनेवर नेटफ्लिक्सने माहितीपट तयार केला होता.

सीरियल किलर्सचे वास्तव्य

1980 च्या दशकात रिचर्ड रामिरेज नावाचा सीरियल किलर या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. रामिरेजने त्या काळात कॅलिफोर्नियात मोठी दहशत निर्माण केली होती. त्याने 6-82 वयोगटातील 13 जणांची हत्या केली होती. त्याला ’द नाइट स्टॉकर’ असे टोपणनाव देण्यात आले होते. कथितपणे 1984 आणि 1985 दरम्यान सेसिल या हॉटेलमधील 1419 असा क्रमांक असलेल्या खोलीत वास्तव्यास होता. या हॉटेलात याचबरोबर जॅक अनटरवेगर नावाचा सीरियल किलरही वास्तव्य करून होता. त्याने कथितपणे तीन महिलांची गळा दाबून हत्या केली होती.

Advertisement
Tags :

.