हसीना यांच्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी संकटात
अंतरिम सरकारकडून होतेय कारवाई
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची विद्याथीं शाखा बांगलादेश छात्र लीगच्या (बीसीएल) नेत्यांवर अंतरिम सरकारकडून कारवाई केली जात आहे. शेख हसीना यांच्याशी संबंधित बीसीएलच्या किमान 50 हजार विद्यार्थ्यांना स्वत:चे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. महाविद्यालय परिसरात अवामी लीगच्या विरोधात हिंसक कृत्ये होत आहेत.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने बीसीएलवर बंदी घालत याला दहशतवादी संघटना ठरविले आहे. बीसीएलशी संबंधित विद्यार्थी आता पलायन करत असल्याची स्थिती आहे. बांगलादेशात जुलैमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. विद्यार्थ्यांनी शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणाली संपुष्टात आणण्याची मागणी करत हिंसा केली होती. या हिंसक आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता.
यानंतर बांगलादेशात अवामी लीगच्या शेकडो नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. अवामी लीगच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आहे. अवामी लीगचे सुमारे 50 हजार सदस्य सध्या संकटात असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. 18 ऑक्टोबर रोजी राजशाही विद्यापीठाच्या बीसीएल नेत्या शहरीन अरियाना हिला अटक करण्यात आली. शहरीनच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले असून अंतिम परीक्षेला बसण्यापूर्वी तिला अटक करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तर त्याच दिवशी बीसीएलचा आणखी एक पदाधिकारी सैकत रायहानला अटक करण्यात आली.