हाशिकाचा 400 मी.फ्रीस्टाईलमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम
77 वी वरिष्ठांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा : 13 वर्षे अबाधित विक्रम मोडित
वृत्तसंस्था/ मंगळूर
77 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय अॅक्वेटिक चॅम्पियनशिपला जोरदार सुरुवात झाली असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 क्रीडा प्रकार घेण्यात आले. महिलांच्या 400 मी. फ्रीस्टाईल जलतरणमध्ये कर्नाटकच्या हाशिका रामचंद्रने 13 वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मोडित काढत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
पुरुषांच्या 400 मी. फ्रीस्टाईलमध्ये कर्नाटकच्या अनीश एस. गौडाने अव्वल स्थान मिळविताना 3:56.59 मि. वेळ नोंदवली. कर्नाटकच्याच दर्शन एस.ने 4:01.39 मि. वेळ नेंदवत दुसरे स्थान मिळविले. हाशिका रामचंद्रने 13 वर्षे अबाधित राहिलेला महिलांच्या 400 मी. फ्रीस्टाईलमधील विक्रम मोडून नवा राष्ट्रीय विक्रम स्थापन केला. याआधीचा विक्रम रांचीच्या रिचा मिश्राच्या (4:25.76) नावावर होता. हाशिकाने 4:24.70 मि.चा नवा विक्रम केला. तेलंगणाच्या वृत्ती अगरवालने 4:25.09 मि. वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळविले.
पुरुषांच्या 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तामिळनाडूच्या धनुश सुरेशने पहिले स्थान मिळविताना 2:18.85 मि. वेळ नोंदवली तर कर्नाटकच्या मणिकांता एलने 2:20.66 मि. वेळेसह दुसरे स्थान मिळविले. महिलांच्या 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कर्नाटकच्या तान्या षडाक्षरीने 2:40.54 मि. वेळ नोंदवत पहिले, महाराष्ट्राच्या ज्योती बाजीराव पाटीलने 2:42.01 मि. वेळेसह दुसरे स्थान मिळविले.
पुरुषांच्या बॅकस्ट्रोकमध्ये कर्नाटकच्या आकाश मणीने 56.15 से. वेळेसह पहिले, महाराष्ट्राच्या रिषभ अनुपम दासने 57.28 से. वेळेसह दुसरे स्थान मिळविले. महिला विभागात बंगालच्या सौब्रिती मोंडलने (1:05.51 से.) पहिले, ओडिशाच्या प्रत्यासा रेने (1:05.82 मि.) दुसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या 50 मी. बटरफ्लाय प्रकारात तामिळनाडूच्या बी. बेनेडिक्टन रोहितने पहिले, महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने दुसरे, महिलांमध्ये बिहारच्या माही स्वेतराजने पहिले, कर्नाटकच्या मानवी वर्माने दुसरे स्थान घेतले.
महिलांच्या 4×200 मी. फ्रीस्टाईल रिलेमध्ये कर्नाटकच्या शिरिन, शालिनी आर. दिक्षीत, नैशा यांनी अव्वल स्थान मिळविताना 8:54.85 मि. वेळ नोंदवली तर महाराष्ट्राच्या दीप्ती रघुनाथ टिळक, दीक्षा संदीप यादव, दक्षजा डे उपरेटी, अदिती सतीश हेगडे यांनी 9:01.15 मि. वेळेसह दुसरे स्थान घेतले. पुरुषांमध्ये या प्रकारात कर्नाटकने (7:42.90 मि.) जेतेपद पटकावले तर आरएसपीबीने (7:47.64 मि,.) दुसरे स्थान मिळविले.