हरियाणा, रेल्वे, मध्यप्रदेश विजयी
वृत्तसंस्था / कटक
येथे सुरू असलेल्या 71 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या दिवशी विद्यमान विजेत्या हरियाणा, रेल्वे आणि मध्यप्रदेश यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले.
या स्पर्धेमध्ये एकूण 30 संघांचा समावेश असून ते प्राथमिक फेरीसाठी 8 गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. पहिल्या सामन्यात हरियाणाने तेलंगणाचा 50-20 अशा गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. हरियाणा संघातील अशु मलिक आणि मोहीत गोयत यांचा खेळ दर्जेदार झाला. ब गटातील दुसऱ्या एका सामन्यात रेल्वेने मणिपूरचे आव्हान 59-27 अशा गुणांनी संपुष्टात आणले. ड गटातील झालेल्या सामन्यात मध्यप्रदेशने आंध्रप्रदेशवर 59-35 अशी मात केली. फ गटातील सामन्यात यजमान ओडिशाने विदर्भचे आव्हान 57-28 असे संपुष्टात आणले. ओडिशा संघातील रोहीत राघवचा खेळ अप्रतिम झाला.