हरियाणा, पंजाब सुपर-8 फेरीत दाखल
वृत्तसंस्था / हैदराबाद
2025 च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत हरियाणाने बंगालचा 24 धावांनी तर पंजाबने गुजरातचा 75 धावांनी पराभव करत सुपर-8 फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात बडोदा संघाने सेनादलाचा 13 धावांनी पराभव केला.
हरियाणा आणि बंगाल यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 20 षटकांत 9 बाद 191 धावा जमविल्या. त्यानंतर बंगालचा डाव 20 षटकांत 167 धावांत आटोपला. हरियाणाच्या डावामध्ये निशांत सिंधूने 48 धावा जमविल्या. तर बंगालच्या मोहम्मद शमीने 30 धावांत 4 गडी बाद केले. या स्पर्धेमध्ये शमीने आतापर्यंत 16 गडी बाद केले आहेत. बंगालच्या डावामध्ये अभिषेक पोरलने 47 धावा केल्या. हरियाणातर्फे इशांत भारद्वाज, सुमितकुमार आणि अनशुल कंबोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 8 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरातचा डाव 16.1 षटकांत 113 धावांत आटोपला. पंजाबच्या डावामध्ये नमनधीरने 36 चेंडूत 61 धावा झोडपल्या. हरप्रित ब्रारने नाबाद 24 धावा जमविल्या. नागवासवालाने 7 धावांत 2 गडी बाद केले. गुजरातच्या डावामध्ये पंजाबच्या आश्विनीकुमार आणि सनवीर सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या स्पर्धेच्या क गटात पंजाबचा संघ 20 गुणांसह पहिल्या तर हरियाणा दुसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात बडोदा संघाने सेनादलाचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात बडोदा संघाने 20 षटकांत 5 बाद 220 धावा जमविल्या. त्यानंतर सेनादलाने 20 षटकांत 8 बाद 207 धावांपर्यंत मजल मारली. बडोदा संघातील अमित पासीने 55 चेंडूत 114 धावा झोडपल्या. अमित पासीचे टी-20 प्रकारातील पदार्पणातच हे पहिले शतक आहे. त्यानंतर सेनादलाच्या डावात पाठकने 51 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे राज लिंबानीने 37 धावांत 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: पंजाब 20 षटकांत 8 बाद 188 (नमनधीर 61, हरप्रित ब्रार नाबाद 24, नागवासवाला 2-7), हरियाणा 20 षटकांत 9 बाद 191 (निशांत सिंधू 48, शमी 4-30), बंगाल 20 षटकांत सर्वबाद 167 (अभिषेक पोरल 47, भारद्वाज, सुमितकुमार, कंबोज प्रत्येकी 2 बळी).
बडोदा 20 षटकांत 5 बाद 220 (अमित पासी 114), सेनादल 20 षटकांत 8 बाद 207 (पाठक 51, लिंबानी 3-37).