हरियाणाचा गुजरातवर 4 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था / अहमदाबाद
रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाइट क गटातील सामन्यात मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी हरियाणाने यजमान गुजरातचा 4 गड्यांनी पराभव करत पूर्ण गुण वसुल केले. हरियाणाच्या पार्थ वत्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात 163 धावा जमविल्यानंतर हरियाणाचा पहिला डाव 239 धावांवर समाप्त झाला. हरियाणाने पहिल्या डावात 76 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर गुजरातचा दुसरा डाव हरियाणाच्या गोलंदाजीसमोर केवळ 137 धावांत आटोपला. हरियाणाला निर्णायक विजयासाठी केवळ 62 धावांची जरुरी होती. पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर हरियाणाला विजयाचे उद्दिष्ट गाठताना 28 षटकात 6 गडी गमवावे लागले. हरियाणाने 6 बाद 62 धावा जमवित हा सामना 4 गडी राखून जिंकला. सिद्धार्थ देसाई आणि विशाल जैस्वाल या गुजरातच्या गोलंदाजांनी 5 बळी मिळविले. पार्थ वत्स आणि यशवर्धन दलाल यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. वत्सने 1 चौकारासह नाबाद 14 तर दलालने 2 चौकारांसह नाबाद 13 धावा केल्या. निशांत सिंधूने 1 षटकारासह 13, धिरु सिंगने 13 धावा जमविल्या.
बंगाल आणि त्रिपुरा यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. बंगालने पहिल्या डावात 336 धावा जमविल्यानंतर त्रिपुराचा पहिला डाव 385 धावांवर आटोपला. त्रिपुराने पहिल्या डावात बंगालवर 49 धावांची आघाडी मिळविली. या आघाडीमुळे त्रिपुराला या सामन्यात तीन गुण मिळाले. त्रिपुराच्या पहिल्या डावात हनुमा विहारीने 141, तर मणीशंकर मुरासिंगने नाबाद 102 धावा झळकविल्या. बंगालतर्फे कैफने 79 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर बंगालने दुसऱ्या डावात 25 षटकात 3 बाद 90 धावा जमविल्या. शहाबाज अहमदने नाबाद 51 धावा केल्या.
रेल्वे आणि आसाम यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. गुवाहाटीमध्ये झालेल्या या सामन्यात रेल्वेने पहिल्या डावात 224 धावा जमविल्यानंतर आसामचा पहिला डाव 209 धावांत आटोपला. रेल्वेला या सामन्यात पहिल्या डावात 15 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविल्याने त्यांना 3 गुण मिळाले. रेल्वेने दिवसअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 97 धावा केल्या.
उत्तराखंड आणि सेनादल यांच्यातील रणजी सामन्यात उत्तराखंडने विजय मिळविला. या सामन्यात उत्तराखंडने पहिल्या डावात 257 धावा जमविल्यानंतर सेनादलाने पहिल्या डावात 223 धावा केल्या. उत्तराखंडला 34 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळाली. त्यानंतर उत्तराखंडचा दुसरा डाव 38 षटकात 88 धावांत आटोपला. अर्जुन शर्माने 41 धावांत 6 तर विकास यादवने 22 धावांत 4 गडी बाद केले. उत्तराखंडने हा सामना 17 धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक: अहमदाबाद-गुजरात प. डाव 163, हरियाणा प. डाव 239, गुजरात दु. डाव सर्वबाद 137, हरियाणा दु. डाव 6 बाद 62
अगरताला-बंगाल प. डाव 333, त्रिपुरा प. डाव 385, बंगाल दु. डाव 3 बाद 90.
गुवाहाटी रेल्वे प. डाव 224, आसाम प. डाव 209, रेल्वे दु. डाव 1 बाद 97.
दिल्ली-उत्तराखंड प. डाव 257, सेनादल प. डाव 223, उत्तराखंड दु. डाव सर्वबाद 88, सेनादल दु. डाव सर्वबाद 105.