हरियाणा विधानसभा अध्यक्षपदी हरविंदर कल्याण
भाजपकडून मोठी जबाबदारी
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाच्या 15 व्या विधानसभेचे विशेष अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. यात नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी शपथ घेतली आहे. तसेच सभागृहाचे अध्यक्ष म्हणून भाजपची करनालच्या घरौंदाचे आमदार हरविंदर कल्याण यांची निवड झाली आहे. तर जींद मतदारसंघाचे आमदार कृष्ण मिड्ढा हे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवडले जाणार आहेत.
हरविंदर कल्याण हे भाजपच्या तिकिटावर रोर समुदायातून निवडून आलेल्या दोन आमदारांपैकी एक आहेत. हरविंदर कल्याण यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करत भाजपने करनाल क्षेत्राला प्रतिनिधित्व दिले आहे. यापूर्वी करनाल जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते.
तर कृष्ण मिड्ढा यांची उपाध्यक्षपदासाठी निवड करत भाजपने पंजाबी-खत्री समुदायाला प्रतिनिधित्व दिले आहे. या समुदायाचे 8 आमदार निवडून आले असून ते सर्व भाजपचे आहेत. जींद क्षेत्रातील शहरी मतदारसंघांमध्ये स्थिती मजबूत करणे हा यामागचा भाजपचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.