जांबोटी-ओलमणी परिसरात सुगीच्या कामांना प्रारंभ
भात कापणीच्या कामाला वेग : रताळी काढणीलाही प्रारंभ
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने उघडीप दिल्यामुळे दिवाळीनंतर या परिसरात सुगीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकरीवर्गाने भात कापणीसह भुईमूग काढणे, रताळी काढणे आदी सुगीच्या कामाला प्रारंभ केला आहे. यावर्षी या भागात बळीराजाला पावसाने प्रारंभापासूनच योग्य साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके जोमात आहेत. या भागातील शेतकरी वर्गाने जुलै महिन्यातच भात रोप लागवडीची कामे पूर्ण केली. यावर्षी या परिसरात झालेल्या मुबलक पावसामुळे भात पिकांना अनुकूल वातावरण होते. शेतवाडीमध्ये भात पिके जोमात असल्यामुळे बळीराजा सुखावला होता. गणेश चतुर्थीनंतर या परिसरात भात पोसवणीला प्रारंभ झाला. दसऱ्यापर्यंत माळरानावरील भात पिके कापणीला आली होती. पावसाने योग्य साथ दिल्यामुळे यावर्षी भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या.
परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने या परिसराला सलग महिनाभर झोडपून काढल्यामुळे हातातोंडाला आलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी भातपिके, वादळी वारे व पावसामुळे भुईसपाट झाली आहेत. वास्तविक, दसऱ्यानंतर माळरानावरील भात पिकांची कापणी करण्यात येणार होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे दिवाळीपर्यंत शेतकरी वर्गांना भात कापणी करणे अशक्य झाल्यामुळे शेतवाडीत भात झढून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गाने भात कापणीला प्रारंभ केला आहे. सध्या माळरानावरील जमिनीतील भात कापणी सुरू असून, पाणथळ शेतवाडीतील भात कापणी या महिन्याच्या अखेरपर्यंत होणार आहे. भात कापणी व मळणीची कामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे मजुरांची टंचाई भासत असून परगावच्या मजुरांना मागणी वाढली आहे. भात कापणी बरोबरच या भागात भुईमूग व रताळी काढणी कामांनादेखील शेतकरी वर्गाने प्रारंभ केला आहे. या भागातील सुगीची कामे साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.