For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी-ओलमणी भागात भात कापणीसह सुगी कामांना वेग

06:24 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी ओलमणी भागात भात कापणीसह सुगी कामांना वेग
Advertisement

वार्ताहर/ जांबोटी

Advertisement

जांबोटी-ओलमणी परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गानी सुगीच्या कामाला प्रारंभ केला असून सध्या भात कापणीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच लगबग सुरू आहे.

यावर्षी जांबोटी परिसरात खरीप हंगामात प्रारंभापासून मान्सूनने योग्य साथ दिल्यामुळे या भागात रोप लागवडीसह सर्वच पिकांची वेळेत लागवड व पेरणी पूर्ण झाली होती. जुलै व ऑगस्ट महिन्यात या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे भात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने भातपिके बहरली होती. यावर्षी जादा उत्पन्न मिळण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु भात पोसवणीनंतर या परिसरात सप्टेंबर, ऑक्टोबर असे सलग दोन महिने अवकाळी पावसाने अनपेक्षितपणे झोडपून काढल्यामुळे हाता-तोंडाला आलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणची भातपिके आडवी झाली. तसेच भात लोंब शेतवडीत झडून त्याला कोंब आल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील शेतकरी वर्ग दिवाळीनंतर भात कापणीच्या तयारीत होते. मात्र ऐन दिवाळीत वादळाच्या प्रभावामुळे पुन्हा पावसाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकरी वर्गासमोर आस्मानी संकट उभारले. उरलीसुरली भातपिके पदरात पाडून घेण्यासाठी उघडिपीच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग होता. अपेक्षेप्रमाणे गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे  शेतकऱ्यांनी भात कापणी तसेच इतर सुगीच्या कामांना प्रारंभ केला आहे. सुगीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. सध्या माळरानावरील जमिनीतील भात कापणी व तुरळक ठिकाणी मळणीची कामे सुरू आहेत. डिसेंबर महिन्यात पाणथळ शेतवडीतील भात कापणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. सध्या भात कापणी व मळणीची कामे एकाचवेळी सुरू असल्यामुळे मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

Advertisement

ऊसतोडणी लांबणीवर

जांबोटी, कुसमळी, ओलमणी, दारोळी, निलावडे, उचवडे, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी आदी गावातील शेतकरी वर्गानी मलप्रभा नदी तसेच कारगिळी नाला परिसरात असलेल्या शेतवडीत मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या प्रारंभी ऊस तोडणीला सुरवात होते. मात्र यावर्षी दिवाळीनंतरदेखील पाऊस सुरुच असल्यामुळे जमिनीत असलेला ओलावा व दलदलीमुळे ऊस वाहतुकीसाठी शेतवडीत वाहने जाणे अशक्य असल्यामुळे ऊस तोडणीची कामे लांबणीवर पडली आहेत.

Advertisement
Tags :

.