कापणीला आलेली पिके भुईसपाट
वार्ताहर /येळ्ळूर
परतीच्या पावसाने माजवलेल्या हाहाकाराने हाता-तोंडाशी आलेली भातपिके भुईसपाट झालेली बघून आता आम्ही काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. प्रारंभी मान्सूनच्या दणक्याने कोवळी पिके पाण्याखाली गेली अन् आता परतीच्या दमदार पावसामुळे कापणीला आलेली उभी पिके आडवी होवून त्यावरून पाणी जात असल्याचे बघून शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. परतीच्या पावसाने धरलेली पाठ अजून किती दिवस अशीच पुढे धरणार आहे हे माहीत नाही. आणखी काही दिवस अस्मानी संकट असेच सुरू राहिले तर पिके काढावी कशी या मनस्थितीत शेतकरी आहे. मागील वर्षी ऐन भरणीच्यावेळी पावसाने दडी मारली आणि पिके भरलीच नाहीत. भातपिकाचा तोटा झाला तो झाला पण, कडधान्येही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दुहेरी तोटा पडला.
गेल्या दोन वर्षापासून अस्मानी संकटाने धरलेली पाठ बघता खर्चाचा ताळमेळ कसा घालावा हा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आतापर्यंत केलेला खर्च पाण्यात गेल्याने हा पडलेला खर्चाचा खड्डा कसा भरून काढावा या विवंचनेत त्याची झोप उडाली आहे. तुटपुंज्या मिळणाऱ्या पिकांवर वर्षभराची गुजारन कशी करावी व अर्थकरणाचे नियोजन कसे करावे या विचारात शेतकरी आहे. निसर्ग तर कोपलाच आहे. पण सरकारने तर थोडीफार दया दाखवावी. आता तरी परतीच्या पावसाने पाठ सोडावी आणि उरली सुरली पिके तरी आमच्या पदरात पडावी या अपेक्षेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने आतापर्यंत पाठीवर मारले आहे. पण या पुढे पोटावर मारू नये.
जीव तीळतीळ तुटतोय
येळ्ळूर, सुळगा, मच्छे, पिरवाडी, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, धामणेसह परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या दोन वर्षाच्या जमाखर्च कसा करावा आणि येणारे दिवस कसे काढावेत याचा आम्ही शेतकरी विचारही करू शकत नाहे. मातीमोल झालेली पिके बघून जीव तीळतीळ तुटतोय असे नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी पाटील म्हणतात.