तालुक्यात सुगी हंगामाची लगबग
सर्व सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई : भुईमूग काढणीलाही सुरुवात
वार्ताहर/किणये
तालुक्यात सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे. शेत शिवारमध्ये भात कापणी, मळणी, रताळी व बटाटा काढणी आदींची लगबग दिसून येत आहे. सर्वच सुगी हंगामातील कामे एकदाच आल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. रविवारी सुगी हंगामासाठी सर्व शिवारे फुलून दिसत होती. यंदा दिवाळीच्या कालावधीत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे सुगी हंगामातील कामे खोळंबली होती. तसेच पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले होते. यामुळे भात कापणीची कामे लांबणीवर पडली. सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. तसेच सुगी हंगामासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सुगी साधण्यासाठी धावपळ सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच भात कापणीला आले होते. मात्र पावसामुळे ते लांबणीवर पडले. शेतकरी सध्या भात कापणी जोमाने करत आहेत. तसेच भात कापणीनंतर काही शेतकरी हुडवे घालून शिवारात ठेवत आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात बटाटा लागवड कमी प्रमाणात करण्यात आली आहे. तर रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे त्या खरीप हंगामातील बटाटा काढणी सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, राकसकोप, हंगरगा, मंडोळी, सावगाव, बोकनूर, यळेबैल, इनाम बडस, बिजगर्णी, बहाद्दरवाडी, किणये, देसूर, झाडशहापूर, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, कर्ले, बेळवट्टी आदी भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या रताळी काढणी जोमाने सुरू आहे.