काकती परिसरात सुगी हंगामाला जोर
मजुरांचा तुटवडा, यंत्राने भातकापणी-मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल : 35 टक्के भात सुगी पूर्ण
वार्ताहर/काकती
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काकती परिसरात भात सुगी हंगाम लांबत चालला होता. परिणामी उशिरा का होईना ढगाळ वातावरण निवळले असून, सुगी हंगामाला पुन्हा जोर आला आहे. मात्र कामासाठी मजूर वर्गाचा तुटवडा भासत असल्याने यंत्राने भातकापणी व मळणी करण्याकडे कल वाढला आहे. काकती शिवारात आजपर्यंत 35 टक्के भाताची सुगी झाली आहे. उत्तरा नक्षत्रात झालेला पाऊस व भात पोसवण्याच्या सुरुवातीपासून खोडकीड व भात पिकात दळे पडणाऱ्या हॉपरबर्न किडीचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणीसाठी 5 टक्के खर्च केला आहे. यामुळे उत्पादनात 2 टक्क्याहून अधिक घट झाली आहे. मात्र फवारणीसाठी अधिक खर्च सोसावा लागला आहे.
उत्पादन खर्चाशी ताळमेळ जमेना
भातशेती कमी खर्चात फायदेशीर व्हावी म्हणून भात पिकाच्या गंजी न बांधता भात कापणीनंतर मळणी व थेट खळ्यावरच धान्याची विक्री अशी सलग कामे करण्यात शेतकरी बांधव दंग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी वेळेत, कमी श्रमात अधिक काम उरकून काटेकोरपणे वेळेचे व्यवस्थापन करीत आहेत. तरीही नफ्याच्या हिशेबात शेतकरी हतबल झाला आहे. उत्पादन खर्चाशी ताळमेळ जमत नसल्याने भातशेती तोट्यात चालली आहे. भात उत्पादक शेतकरी केवळ काबाडकष्टाचा धनी झाला आहे.
मोठ्या-मध्यम शेतकऱ्यांची परवड
गेल्या 46 वर्षात शेतकरी अल्पभूधारक झाला असल्याने घरोघरी शेतीव्यतिरिक्त काम, उद्योग, व्यवसाय व खासगी नोकरवर्ग निर्माण झाला आहे. काकती-होनगा औद्योगिक वसाहतीत जाणारा मोठा वर्ग आहे. शेतीपेक्षा इतर कामधंद्यात शारीरिक श्रम कमी करावे लागतात. मिळणारी रोजंदारीची मजुरीही शेतीतील कामापेक्षा अधिक आहे. लहान शेतकरी आपल्या मुलांना शेती व्यतिरिक्त इतर कामधंद्यात गुंतवून शेतीत मजुरांकडून काम करून घेत आहेत. महिला वर्गही रोजगार हमी योजना, कारखाने, हॉटेलात कामाला रोजंदारीवर जात आहेत. परिणामी त्यामुळे शेतमजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे.