For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिनेशकडून हर्षवर्धन घिस्यावर चारीमुंड्या चित

10:28 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिनेशकडून हर्षवर्धन घिस्यावर चारीमुंड्या चित
Advertisement

संदीप मोटे, कार्तिक काटे, प्रतीक जज्जर, पार्थ पाटील या कुस्तीपटूंचेही प्रेक्षणीय विजय : विविध मान्यवरांसह पंचवीस हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची उपस्थिती

Advertisement

खानापूर : खानापूर येथे खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय भव्य कुस्ती मैदानात हरियाणाचा दिनेश गुलियाने अवघ्या आठव्या मिनिटाला घिस्सा डावावरती चित्त करून तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत संदीप मोटेने रॉबिन हुड्डाचा नौंदल घिस्यावर चित करून उपस्थित पंचवीस हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. बुधवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी हिंद केसरी व भारत केसरी दिनेश गुलिया व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यातील प्रमुख कुस्ती आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, लक्ष्मण बामणे, हणमंत गुरव, पांडुरंग पाटील, लक्ष्मण झांजरे, महम्मद नंदगडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला दिनेश गुलियाने एकेरी पट काढून हर्षवर्धनला खाली घेत घिस्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण ताकदीने मजबूत असलेल्या सदगीरने त्यातून आपली सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला पायाला चाट मारून सदगीरने दिनेश गुलियावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारून गुलियाने सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला गुलियाने एकेरी पट काढत हर्षवर्धनला खाली घेत मानेवरचा कस काढून घुटना फिरविण्याचा प्रयत्न करताना हर्षवर्धनने खालून दशरंग मारून सुटका केली. पण लागलीच आठव्या मिनिटाला दिनेश गुलियाने एकेरी पट उपसत हर्षवर्धन सदगीरला खाली घेऊन झोळी बांधून त्यानंतर घिस्या डावावरती चारीमुंड्या चित्त करून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे व भारत केसरी रॉबिन हुड्डा यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, महाबळेश्वर पाटील, सदानंद मासेकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पाचव्या मिनिटाला संदीप मोटेने पायाला आखडी लावून रॉबिन हुड्डाला खाली घेत एकलांगी भरून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण हुड्डाने त्यातून सुटका करून घेतली. चौदाव्या मिनिटाला संदीपने पायाला आखडी लावून दोन्ही हाताचे हप्ते भरून खाली घेत नोंदल घिस्सा मारून चित्त केले.

डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व पंजाबचा सुमितसिंग यांच्यातील तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती तालुका कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते  लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला सुमितसिंगने एकेरी पट काढून कार्तिक काटेला खाली घेतले व निकालावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण कार्तिकने सुटका करून घेतली. तिसऱ्या मिनिटाला पुन्हा सुमितने दुहेरी पट काढत कार्तिकला खाली घेतले. कार्तिकने खालून डंकी मारून सुमितवर कब्जा मिळविला. व नवव्या मिनिटाला कार्तिक काटेने पायाला एकलांगी भरून एकलांगीवरती नेत्रदीपक विजय मिळवित कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली. चौथ्या क्रमांकाची कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व हरियाणाचा प्रतिक जज्जर यांच्यातील कुस्ती नासीर बागवान, महम्मद नंदगडी, भावकाण्णा पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला संगमेश बिराजदारने दोन्ही हाताचे हप्ते भरून चित्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असताना प्रतिक जज्जरने हप्ता उलटून संगमेशला हप्ते डावावरती चित केले. संगमेशला त्याचाच डाव त्याला अंगलट आला व त्याला पराभवास सामोरे जावे लागले.

Advertisement

Charimundya Chit on Harshvardhan Ghisa from Dineshशिवानंद दड्डी व उदयकुमार टायसन कोल्हापूर यांच्यातील पाचव्या क्रमांकाची कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी प्रकाश इंगळगीने कोल्हापूरच्या प्रणव यादव याचा छडीटांग डावावर पराभव केला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत  किर्तीकुमार कार्वे याने एकेरी पट काढत दत्ता बनकरला खाली घेत कोंध एकचाट डावावरती चित करून वाहवा मिळविली. आठव्या क्रमांकाची विक्रम सोनोली व दर्शन चव्हाण यांच्यातील कुस्ती डाव प्रतिडावाने शेवटपर्यंत झुंजली. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिक्कदिनकोपने साताराच्या कृष्णा सावंतवर एकलांगी डावावरती नेत्रदीपक विजय मिळविला. त्याचप्रमाणे दयानंद शिरगाव घिस्सा, कार्तिक इंगळगी एकलांग, महादेव इटगी घिस्सा, सूरज कडोळी घिस्सा, निरंजन येळ्ळूर घुटना, तिमाण्णा मुधोळ एकचाक, राजू गंदिगवाड यांनी एकलांगी डावावर विजय मिळविले. तर रुपेश कर्ले, वैष्णव कुद्रेमनी, महांतेश संतिबस्तवाड, राहुल किणये, रुद्राप्पा अवरोळी, राहुल माचीगड, अभय पुणे, प्रज्ज्वल मच्छे, रचिकेत रणकुंडे, प्रताप खादरवाडी, करण खादरवाडी, केशव मुतगा, मंथन सांबरा, सचिन कडोळी, सलील रणकुंडे, प्रज्ज्वल वडगाव, विश्वास बेळगुंदी, श्रीनाथ शिनोळी, सत्यजीत बुद्धिहाळ, संभव शिनोळी, शिवतेज निपाणी यांनी आपल्या प्रतिस्पर्धकांवर मात केली.

आकर्षक कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने गुत्याप्पा दावणगिरीचा मानेवरती घुटना ठेवून फिरविण्याचा प्रयत्न करून कळत नकळत हात लावून घिस्यावरती चित्त करून उपस्थित कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली. गणेश सरवनकर व महेश तीर्थकुंडे यांच्यातील मेंढ्याची कुस्ती सदानंद होसूरकर यांच्या हस्ते लावण्यात आली. पण ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत सोडविली. कुस्तीचे समालोचन राशीवडेच्या कृष्णकांत चौगुले यांनी कुस्तीच्या शैलीत केले. त्यांना प्रकाश मजगावी यांची साथ मिळाली. कागलचे हलगीवादक सुनील नागरपोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हलगीवादनाने सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले. कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर, हणमंत गुरव, यशवंत अल्लोळकर, लक्ष्मण बामणे, रुद्राप्पा हिंडोरी, सुधीर बिर्जे, बाळाराम पाटील, नवीन मुतगी, कृष्णा पाटील, पिराजी मुचंडीकर, प्रशांत पाटील चापगाव, सुरेश अष्टगी, पांडुरंग पाटील, मारुती तुळजाई, प्रदीप देसाई, प्रकाश तीर्थकुंडे, राजू कडोली, अर्जुन देसाई, जयवंत खानापूरकर, मोहीद्दीन दावणगिरी यांनी काम पाहिले. प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील कक्पेरी येथील जवान मंजुनाथ आंबडगट्टी यांचा दिल्ली येथे अपघातात ठार झाल्याने त्यांना या कुस्ती मैदानात श्रद्धांजली वाहण्यात आली.

महिलांची कुस्ती बरोबरीत

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास महिलांची कुस्ती आयोजित करण्यात आली होती. धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते राष्ट्रीय चॅम्पियन ऋतुजा गुरव गणेबैल व कर्नाटक चॅम्पियन राधिका संतिबस्तवाड यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला ऋतुजाने एकेरी पट काढून घिस्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून राधिकाने सुटका करून घेतली. शेवटी ही कुस्ती बरोबरीत राहिली.

Advertisement
Tags :

.