For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई कसोटीसाठी हर्षित राणाची टीम इंडियात एंट्री

06:57 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई कसोटीसाठी  हर्षित राणाची टीम इंडियात एंट्री
Advertisement

‘रणजी’सोडून दाखल होण्याची बीसीसीआयची सूचना : वॉशिंग्टन सुंदर पाठोपाठ प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता क्लीन स्वीप टाळण्यासाठी व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागणार आहे. तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाने मोठी खेळी खेळली आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. राणाला दिल्ली संघ सोडून रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisement

पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी गंभीर यांनी असाच एक मोठा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी गंभीरने संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली होती. हा निर्णय सर्वात यशस्वी ठरला होता. कारण वॉशिंग्टन सुंदरने दोन्ही डावात 13 विकेट्स मिळवत आपली निवड किती सार्थ होती, हे दाखवून दिले होते. हर्षितने नुकत्याच आसामविरुद्ध खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात दमदार कामगिरी करत अर्धशतक ठोकले आणि पाच बळी घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षितला न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यातून हर्षित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण करु शकतो, असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, अलीकडेच त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याआधी हर्षितला भारतीय संघात संधी मिळाली होती पण प्लेईंग 11 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. यामुळे मुंबई कसोटीत त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बुमराह किंवा आकाशदीपला विश्रांती देण्याची शक्यता

हर्षित राणा मुंबई कसोटीसाटी टीम इंडियात दाखल झाला, तर तो खेळताना दिसणार हेही निश्चित आहे. यामुळे जसप्रीत बुमराह किंवा आकाश दीप यांना विश्रांती दिली जाऊ शकते. या मालिकेत आकाशदीप एकच सामना खेळला आहे, मात्र बुमराह सातत्याने खेळत आहे. आता भारताने मालिका गमावली असून पुढील महिन्यापासून टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यासाठी बुमराह फिट असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे कदाचित बुमराहला विश्रांती देण्यात येईल असे चिन्ह आहे. नवख्या आकाशदीपला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वानखेडेची खेळपट्टी ठरणार निर्णायक

भारत व न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. दरम्यान, वानखेडेच्या खेळपट्टीवरुन बरीच मतमतांतरे सुरु आहेत. वेगवान गोलंदाजांना बेंगळूरमध्ये मदत मिळाली आणि पुण्यात फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. मात्र, मुंबईतील वातावरण थोडे वेगळे असू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बीसीसीआयचे मुख्य पिच क्युरेटर आशिष भौमिक आणि एलिट पॅनेलचे क्युरेटर तपोश चॅटर्जी आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर रमेश मामुनकर यांनी खेळपट्टीचा आढावा घेतला. हा एक स्पोर्टिंग ट्रॅक असेल. सध्या खेळपट्टीवर काही गवत आहे. पहिल्या दिवशी ही विकेट फलंदाजीसाठी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे, परंतु दुसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंना टर्न मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे मुंबई कसोटीत किवी संघ बाजी मारणार की टीम इंडिया हा सामना जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियाची वानखेडेवरील कामगिरी -

वानखेडे स्टेडियममधील भारतीय संघाची आकडेवारी संमिश्र अशी आहे. टीम इंडियाने 1975 पासून ते आतापर्यंत एकूण 26 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 12 सामन्यातच भारताला विजयी होता आले आहे. तर 7 गमावल असून तितकेच सामने बरोबरीत सोडवले आहेत. भारताला वानखेडेत गेल्या 5 पैकी एकाच सामन्यात पराभूत व्हावे लागलं आहे. इंग्लंडने 2012 साली भारताला वानखेडे लोळवलं होते, तेव्हापासून गेल्या 12 वर्षांपासून टीम इंडिया अजिंक्य आहे.

केन विल्यम्सन तिसऱ्या कसोटीलाही मुकणार

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीप्रमाणेच तिसऱ्या कसोटीतही विल्यम्सन न्यूझीलंडचा भाग होऊ शकणार नाही. कंबरेच्या दुखापतीमुळे विल्यम्सन क्रिकेटपासून दूर आहे. विल्यम्सन इंग्लंडविरुद्ध आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तंदुरुस्त होण्यासाठी मुंबईतील तिसऱ्या कसोटीसाठी भारतात येणार नाही, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिका 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ब्लॅककॅप्सचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, विल्यम्सनने चांगली कामगिरी केली आहे, परंतु सावध पवित्र्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वेळ मिळेल. परिस्थिती आशादायक दिसत असली तरी न्यूझीलंडमध्ये राहणे आणि पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणे हा त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. जेणेकरून तो इंग्लंडकडून खेळण्यास तयार होऊ शकेल.

Advertisement
Tags :

.