Sangali News: हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी संघटनांकडून निषेध, सखोल चौकशीची मागणी
जिल्ह्यातील ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष
सांगली: तांदुळवाडी (ता वाळवा) येथील ठेकेदार हर्षल पाटील यांनी कामाची बिले मिळत नसल्याच्या नैराश्यातून बुधवारी आत्महत्या केली. त्यानंतर जिल्हाभरातील ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गुरुवारी एकच गर्दी केली. जलजीवन योजना ठेकेदार संघटना, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला.
संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली. आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी केली, हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आवारात गुरुवारी सकाळपासूनच शेकडो ठेकेदार गोळा झाले होते. सर्व तालुक्यांतून आलेल्या ठेकेदारांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला.
जलजीवन योजना ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष पी. टी. माळी यांनी सांगितले की, जलजीवनच्या कामाचे पैसे मिळत नसल्याने राज्यभरात कामे ठप्प आहेत. ठेकेदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेत. कामे रखडण्याला आणि बिले थकण्याला शासनच कारणीभूत आहे. कामांचे आराखडे खासगी सल्लागार कंपनीने कार्यालयात बसूनच तयार केले, त्यामुळे खर्च अवास्तव वाढला आहे. त्यात ठेकेदार भरडले जात आहेत. आठ महिन्यांपासून कोट्यवधींची बिले प्रलंबित आहेत.
योजनेच्या लोकवर्गणीसाठी म्हणून १० टक्के लोकसहभागाची रक्कमही ठेकेदारांनाच भरावी लागली आहे. त्यामुळे ठेकेदार कर्जात रुतले आहेत. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेनेही आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची सखोल चौकशीची मागणी केली. दरम्यान, दोन्ही संघटनांनी जिल्हा परिषद आवारात हर्ष पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हा परिषद सीईओ व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.
यावेळी पी. टी. माळी यांच्यासह महावीर पाटील, हिम्मत कोळी, हेमंत मोरे, राजेंद्र गौड, अमोल माळी, जुबेर इनामदार, सचिन मोहिते, वाघेश जाधव, बापूसाहेब तंगडे, अरुण माने, राकेश कुरणे, सचिन पाटील, निळकंठ मांगलेकर, प्रवीण कोले, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचा पाठींबा
मराठा क्रांती मोर्चाने ठेकेदारांना पाठिंबा जाहीर केला. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या नाकर्तेपणामुळेच एका होतकरु अभियंत्यावर आत्महत्येची वेळ आली. शासनाने ठेकेदारांची बिले त्वरित अदा करावीत. निवेदनावर डॉ. संजय पाटील, अभिजित शिंदे, नितीन चव्हाण, शरद देशमुख, राजेश जगदाळे, राहुल पाटील, सतीश साखळकर, विजय साळुंखे, रुपेश मोकाशी, विश्वजित पाटील आदींच्या सह्या आहेत.