‘युएन’मध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल
काँग्रेसच्या खासदाराने दिले चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघात बुधवारी भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानला यावेळी भारत सरकारच्या अधिकाऱ्याने नव्हे तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदाराने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा अनावश्यक स्वरुपात उपस्थित केल्याप्रकरणी पाकिस्तानला फटकारले आहे.
पाकिस्तानचे शिष्टमंडळ वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करते आणि चुकीची माहिती फैलावते, प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूपच वेगळी असल्याचे राजीव शुक्ला यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला संबोधित करताना म्हटले आहे. माहितीचे महत्त्व आणि यात भारताच्या भूमिकेच्या मुद्द्यावर शुक्ला यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला संबोधित केले आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघासमोर काश्मीरसंबंधी राग आळवला होता. पुन्हा एकदा पाकिस्तानी शिष्टमंडळाने असत्य आणि बनावट माहिती फैलावण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे. या शिष्टमंडळाला खोटी आणि भ्रामक माहिती पसरविण्याची सवय झाली आहे. खरीखुरी लोकशाही असलेला देश वेगळ्या प्रकारे काम करतो हे मी अत्यंत स्पष्ट करू इच्छितो. अलिकडेच पार पडलेल्या निष्पक्ष निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या लोकांनी विक्रमी संख्येत मतदान केले आहे. पाकिस्तानने कितीही असत्य फैलाविले तरीही वस्तुस्थिती बदलणार नसल्याचे शुक्ला यांनी सुनावले आहे.
खोट्या माहितीला स्थान नाही
खोटी माहितीमुळे कुठल्याही प्रमाणात वस्तुस्थिती बदलणार नाही. पाकिस्तानी शिष्टमंडळाला स्वत:च्या विभाजनकारी राजकीय अजेंड्यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्याऐवजी अधिक रचनात्मक स्वरुपात सहभागी होण्याचा आग्रह करत आहे. चुकीच्या माहितीच्या विरोधातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभियानाला भारत समर्थन करणे जारी ठेवणार असल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे.