हॅरी ब्रुकचे शतक, इंग्लंडचा जोरदार पलटवार
दुसऱ्या दिवसअखेरीस इंग्लंडच्या 5 बाद 319 धावा : ओली पोपचेही अर्धशतक
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
हॅरी ब्रुक आणि ऑली पोप यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या ख्राईस्टचर्च कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने 5 बाद 319 धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक 163 चेंडूंत 132 धावा करत नाबाद आहे. त्याला कर्णधार बेन स्टोक्स (76 चेंडूत नाबाद 37) साथ देत आहे. इंग्लंडचा संघ अद्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला.
प्रारंभी, किवींनी दिवसाची सुरुवात 8 बाद 319 धावसंख्येवरुन पुढे केली. संघाने शेवटच्या 2 विकेट 29 धावांवर गमावल्या आणि 348 धावांवर सर्वबाद झाला. ग्लेन फिलिप्सने आपले अर्धशतक पूर्ण करताना 87 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 58 धावांचे योगदान दिले. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. टीम साऊदी 15 धावांवर, विल्यम ओ‘रुर्क शून्यावर बाद झाले. यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडचाही जोरदार पलटवार
न्यूझीलंडच्या 348 धावांच्या प्रत्युत्तर देताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॅक क्रॉलीला भोपळाही फोडता आला नाही. त्याला मॅट हेन्रीने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर डावातील 15 व्या षटकात युवा गोलंदाज नॅथन स्मिथने जेकेब बेथेल व अनुभवी जो रुटला लागोपाठ बाद केले. रुटला शुन्यावर बाद करत त्याने न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले. यानंतर बेन डकेटने 6 चौकारासह 46 धावांचे योगदान दिले पण त्यालाही ओरुकेने माघारी पाठवले. डकेट बाद झाला तेव्हा इंग्लंडची 4 बाद 72 अशी स्थिती होती. डकेट बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओली पोपने हॅरी ब्रुकला चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. ओली पोपने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 98 चेंडूत 8 चौकारासह 77 धावा फटकावल्या. एकेरी दुहेरी धावांवर भर देत मैदानात जम बसवलेल्या पोपचा अडथळा साऊदीने दूर केला.
ब्रुकचे नाबाद शतक
ओली पोप बाद झाल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स मैदानात फलंदाजीसाठी आला. स्टोक्स व ब्रुक जोडीने 97 धावांची भागीदारी साकारत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. यादरम्यान ब्रुकने कसोटीतील सातवे शतक साजरे करताना 163 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह नाबाद 132 धावा केल्या. स्टोक्सनेही त्याला चांगली साथ देताना 4 चौकारासह 37 धावांचे योगदान दिले. शतकी खेळीसह ब्रुकने कसोटीत दोन हजार धावांचा टप्पा पार केला. याशिवाय, त्याचे हे यंदाच्या वर्षातील तिसरे शतक ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावत 319 धावा केल्या होत्या. ब्रुक 132 तर स्टोक्स 37 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव सर्वबाद 348
इंग्लंड पहिला डाव 74 षटकांत 5 बाद 319 (बेन डकेट 46, ओली पोप 77, ब्रुक खेळत आहे 132, स्टोक्स खेळत आहे 37, नॅथन स्मिथ 2 तर साऊदी, हेन्री व ओरुके प्रत्येकी एक बळी).
ग्लेन फिलिप्सचा क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम झेल
इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हॅगली ओव्हलवर खेळवला जात आहे. या सामन्यात फिलिप्सने उंच उडी घेत असा अप्रतिम झेल घेतला की सगळेच थक्क झाले. हॅरी ब्रुक आणि ओली पोपने किवी किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होते. पोप 77 धावांवर खेळत होता. फॉर्मात असलेल्या पोप टीम साऊदीला चौकार लगावण्यासाठी गेला आणि तितक्यात फिलीप्सने हवेत झेप घेत त्याला झेलबाद केले. पोपने साऊदीच्या ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू जोरात कट केला. हा चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात होता. पण पॉइंटला फिल्डिंग करत असलेल्या ग्लेन फिलिप्सने हवेत उजवीकडे डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला. हा चेंडू खूप दूर आणि वेगाने जात होता. पण तशाही परिस्थितीत फिलिप्सने तो पकडला. काही वेळ मैदानातील प्रेक्षकही स्तब्ध झाले होते पण फिलिप्सच्या अप्रतिम झेलनंतर सर्वस्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.