एफआयएच वार्षिक पुरस्कारासाठी हरमनप्रीत, श्रीजेशला नामांकन
वर्षातील सर्वोत्तम खेळाडू व सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्काराच्या शर्यतीत
वृत्तसंस्था/लुसाने, स्वित्झर्लंड
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे (एफआयएच) वार्षिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली असून भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी लेजेंडरी गोलरक्षक पीआर श्रीजेशचे नामांकन झाले आहे.एफआयएचने ही यादी जाहीर केली आहे. अलीकडेच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले.या यशात हरमनप्रीत व पीआर श्रीजेश या दोघांची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. कर्णधार हरमनप्रीतने आघाडीवर राहत स्पर्धेत एकूण 10 गोल नोंदवले. स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणारा तोच खेळाडू ठरला होता. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी हरमनप्रीतसह नेदरलँड्सच्या थिएरी ब्रिंकमन व जोएप डी मोल, जर्मनीचा हॅनेस म्युलर, इंग्लंडचा झॅच वॉलेस यांनाही नामांकन मिळाले आहे.
कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळलेल्या श्रीजेशने संपूर्ण स्पर्धेत शानदार गोलरक्षण केले. विशेषत:ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले, त्यावेळी त्याने जबरदस्त प्रदर्शन केले. भारताने हा सामना अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. नंतर तिसऱ्या स्थानाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव करून कांस्यपदक निश्चित केले होते. सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठी श्रीजेशसह नेदरलँड्सचा पर्मिन ब्लाक, स्पेनचा लुईस काल्झाडो, जर्मनीचा जीन पॉल डॅनेबर्ग व अर्जेन्टिनाचा टॉमस सांतियागो यांनाही नामांकन मिळाले आहे.
‘प्रत्येक कॉन्टिनेन्टल फेडरेशन्सने निवडलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी यांच्या एक्सपर्ट पॅनेलने खेळाडूंची यादी तयार केली आहे. या तज्ञ पॅनेलला 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांची माहिती पुरविण्यात आली, त्यात कसोटी सामने, एफआयएच प्रो हॉकी लीग, एफआयएच हॉकी नेशन्स कप, एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा यांचा समावेश आहे. या सर्वांचा अभ्यास करून पॅनेलने नामांकन मिळालेल्या खेळाडूंची यादी तयार केली आहे,’ असे एफआयएचने सांगितले. ऑक्टोबर 11 पर्यंत राष्ट्रीय संघटनांसाठी (त्या त्या संघांचे कर्णधार व प्रशिक्षक) तसेच हॉकी शौकीन, खेळाडू, प्रशिक्षक व पंच, पदाधिकारी आणि मीडिया यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. तज्ञ पॅनेलच्या मतांना 40 टक्के, राष्ट्रीय संघटनांच्या मतांना 20 टक्के महत्त्व असेल. याशिवाय शौकीन व अन्य खेळाडू यांना 20 टक्के आणि मीडियाला 20 टक्के महत्त्व दिले जाईल, असेही एफआयएचने पुढे सांगितले.
एफआयएच हॉकी स्टार्ससाठी नामांकन मिळालेले खेळाडू : महिला-जी. ब्ंिांगफेंग चीन, यिबी जॅन्सेन नेदरलँड्स, निके लॉरेन्झ जर्मनी, स्टेफनी व्हान्डेन बोअरे बेल्जियम, झान डी वार्ड नेदरलँड्स. पुरुष-थिएरी ब्रिंकमन नेदरलँड्स, जोएप डी मोल नेदरलँड्स, हॅनेस म्युलर जर्मनी, हरमनप्रीत सिंग भारत, झॅच वॉलेस इंग्लंड.
वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षकासाठी नामांकित खेळाडू : महिला-क्रिस्टिना कोसेन्टिनो अर्जेन्टिना, आयलिंग डीहूग बेल्जियम, नथाली कुबाल्स्की जर्मनी, अॅनी वीनेन्डाल नेदरलँड्स, ये जिआव चीन. पुरुष-पर्मिन ब्लाक नेदरलँड्स, लुईस काल्झाडो स्पेन, जीन पॉल डॅनेबर्ग जर्मनी, टॉमस सांतियागो, पीआर श्रीजेश भारत.
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूसाठी नामांकित झालेले खेळाडू : महिला-क्लेअर कॉलविल ऑस्ट्रेलिया, झो डायझ अर्जेन्टिना, टॅन जिन्झहुआंग चीन, एमिली व्हाईट बेल्जियम, लिनीया वीडेमन जर्मनी. पुरुष-बॉटिस्टा कॅपुरो अर्जेन्टिना, ब्रुनो फाँट स्पेन, सुफियान खान पाकिस्तान, मिचेल स्टूटहॉफ जर्मनी, अर्नो व्हान डेसेल बेल्जियम.