हरमनप्रीत सिंग, सविता पुनिया सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या येथे झालेल्या सातव्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता पुनिया यांना बलबीर सिंग पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 2024 च्या हॉकी हंगामात हरनप्रीत सिंग आणि सविता पुनिया हे सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून ठरले आहेत.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळविले असून या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे होते. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी प्रकारात कांस्यपदक मिळविण्याचा पराक्रम केला. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या हॉकीतील कांस्यपदक भारतीय संघाला थोडक्यात हुकले. या संघामध्ये सविता पुनियाकडे गोलरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र कांस्यपदकाच्या लढतीमध्ये ब्रिटनकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता.
हॉकी इंडियाच्या सातव्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभामध्ये देशातील अनेक माजी हॉकीपटूंचा गौरव करण्यात आला. भारतीय हॉकी क्षेत्राला 100 वर्षे पूर्ण झाल्याने या समारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे 1975 साली कौलालंपूर येथे भारतीय हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली होती. या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण झाल्याने तत्कालीन हॉकीपटूंचा या समारंभात गौरव करण्यात आला. 1975 च्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला मेजर ध्यानचंद आजीवन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 2024 च्या हॉकी हंगामात अभिषेकला सर्वोत्तम आघाडीपटूचा पुरस्कार तर हार्दिक सिंगला मध्य फळीतील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार त्याचप्रमाणे अमीत रोहिदासला बचावफळीतील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार देण्यात आला. 21 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या विभागात अर्जित सिंग हुंडालला तर महिलांच्या विभागात दीपिकाला जुगराज सिंग पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हॉकी इंडियाच्या या पुरस्कार वितरण समारंभाला भारताचे माजी क्रीडा मंत्री किरण रिजीजू, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की, सचिव भोलानाथ सिंग त्याचप्रमाणे हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हरमनप्रीत सिंगला रोख 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पी.आर. श्रीजेशला 5 लाख रुपयांचे, दीपिकाला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. महिला विभागात सविता पुनियाला 5 लाख रुपये रोख देण्यात आले.