शहर परिसरात हरितालिका व्रत भक्तिभावाने
बेळगाव : शहर परिसरात महिलांनी हरितालिका व्रत मोठ्या श्रद्धेने आचरणात आणले. मनासारखा पती मिळावा, यासाठी हे व्रत केले जाते. पार्वतीने शंकराशीच विवाह करण्याची इच्छा धरली. मात्र, तिच्या वडिलांनी विष्णूबरोबर तिचा विवाह करण्याचे ठरविले होते. हे मान्य नसल्याने पार्वतीने वनात जाऊन शिवलिंगाची स्थापना करून आपल्या सखीसमवेत मनोभावे पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. पार्वतीला जसा मनासारखा पती मिळाला तसाच आपल्यालाही मिळावा यासाठी कुमारिका आणि आपले सौभाग्य अखंड राहावे, यासाठी महिला हरितालिकेचे व्रत करतात. या व्रतासाठी आवश्यक हरितालिकेच्या मूर्ती बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या. हरितालिका आणि तिच्या सोबत तिची सखी अशा दोघींची महिलांनी मंगळवारी प्रतिष्ठापना करून त्यांची पूजा केली. फुले, पत्री, शिवाय केवडा यांनी मूर्तीची पूजा करण्यात आली. सोबत स्थापन केलेल्या शिवलिंगाचीही पूजा करण्यात आली. आरती व कथा वाचन करण्यात आले. रात्री महिलांनी जागरण केले. वास्तविक पूर्ण दिवस उपवास करून दुसरे दिवशी रुईच्या पानांवर तूप लावून ते चाटून उपवास सोडण्याची प्रथा आहे. काळानुरुप त्यामध्ये बदल करून आपल्याला शक्य तसे हे व्रत महिला करतात.