झोळंबे पांडुरंग मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ
ओटवणे । प्रतिनिधी
झोळंबे येथील पांडुरंग मंदिरात मंगळवार पासून सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून मंगळवारी २ डिसेंबरला या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. यानिमित्त किर्तन, प्रवचन, भजन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह भ प सद्गगुरू वासुदेव महाराज वझे यांचे परमभक्त असलेला श्री संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय व अनुयायी भक्तमंडळी यांच्या सेवेतून हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. यानिमित्त पांडुरंग मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता काकड आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ६ वाजता कीर्तन व भजन, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ, रात्री स्थानिक ग्रामस्थांची भजने त्यानंतर रात्री दिंडीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या ७५० वर्ष तसेच संत तुकाराम महाराजांचे ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त रोज सकाळी ८ ते १२ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे.सोमवार १ डिसेंबर रोजी सहस्त्र दीपोत्सवाचा कार्यक्रम तर मंगळवारी २ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीनंतर दयानंद सावंत यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर आरती दिंडी आटोपल्यानंतर दुपारी महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.