मालवण समुद्र किनारी ''अमूर ससाण्याला'' जीवदान
युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने केले रेस्क्यू
मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांनी मत्स्य लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या अमूर ससाण्याची सुटका करत जीवदान दिले. मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना अमूर ससाण्याला कावळे बोचत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रमोद खवणेकर ,जगदीश तोडणकर ,भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर यांनी अमूर ससाण्याची कावळ्यापासून सुटका केली. त्यानंतर युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या सदस्यांशी संपर्क केला असता दर्शन वेंगुर्लेकर, मेगल डिसोजा, साहिल कुबल, स्वाती पारकर, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमूर ससाण्याला कांदळवन असलेल्या भागात नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अमूर ससाणा हा सायबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्याच्या दरम्यान तो भारतात येतो. सलग पाच हजार किलोमीटर अंतर न थांबता अरबी समुद्र पार करण्याची क्षमता या पक्षात आहे.