ओटवणे सातेरी रवळनाथ पंचायतनचा आजपासुन वार्षिक उत्सव
दोन जत्रोत्सवासह हरिनाम सप्ताह व समराधना कार्यक्रम
ओटवणे प्रतिनिधी
जिल्ह्यातील जागृत देवस्थान तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओटवणे येथील श्री सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या वार्षिक उत्सवास रविवारी २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार आहे. या वार्षिक उत्सवात दोन जत्रोत्सवासह हरिनाम सप्ताह आणि समराधना कार्यक्रम होणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेला २६ नोव्हेंबरला होणारा या देवस्थानचा उत्सव ओटवणे गावचे ग्रामदैवत रवळनाथाचा वार्षिक उत्सव म्हणून प्रसिध्द आहे. यानिमित्त रात्री कार्तिक उत्सव अर्थात जागर उत्सवाची सांगता होणार असुन सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर रात्री उशिरा ओटवणे गावातील दशावतार कलाकारांचे नाटक होणार आहे.
सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सात प्रहाराच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी निघणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी या हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर बुधवारी २९ नोव्हेंबरला सरकारी समराधना आणि गुरूवारी ३० नोव्हेंबरला गुरांची समराधना होणार आहे. शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणारी सातेरीची जत्रा पंचमीची जत्रा म्हणून प्रसिध्द आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकी नंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.