हरिका, वैशाली उपउपांत्यपूर्व फेरीत, वंतिका बाहेर
वृत्तसंस्था/ बटुमी (जॉर्जिया)
फिडे वर्ल्ड वुमन्स चेस कपच्या येथे झालेल्या टायब्रेकरमध्ये भारतीय ग्रँडमास्टर्स डी. हरिका आणि आर. वैशाली यांनी अनुक्रमे ग्रीसच्या त्सोलाकिडो स्टॅव्हरोला आणि अमेरिकन खेळाडू कॅरिसा यिप यांना हरवून प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला.
दोन्ही खेळाडूंसाठी 10 मिनिटे देणाऱ्या टायब्रेकर गेमच्या दुसऱ्या संचात हरिकाने स्टॅव्हरोलाच्या बचावफळीला भेदले, तर तर वैशालीच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे पहिल्या संचात यिपला पराभव पत्करावा लागला. कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आधीच अंतिम 16 खेळाडूंच्या यादीत पोहोचलेल्या असल्याने भारताकडे आता स्पर्धेचा 25 टक्के हिस्सा राहिलेला आहे. तथापि, ग्रँडमास्टर वंतिका गरेवाल रशियाच्या कॅटेरीना लॅग्नोकडून पराभूत झाल्याने बाहेर पडली. तिने खूप जिद्द आणि दृढनिश्चय दाखवला. पण शेवटी अनुभव लाग्नोच्या कामी आला.
पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या खेळाडू महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार असल्याने ही लढाई आता अधिक तीव्र होणार आहे. कँडिडेट्स स्पर्धेतून चीनची विद्यमान विजेती वेनजुन जूचा आव्हानवीर ठरणार आहे. हरिकाने नेहमीप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी केली आणि तिने काही अनपेक्षित चुकांचा फायदा घेत स्टॅव्हरोलाला हरवले. अमेरिकन यिपविऊद्धच्या सामन्यात वैशालीचे पारडे जड होते आणि तिने तिच्या चाहत्यांना निराश केले नाही.
पुढील फेरी चारही भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची असेल. कारण त्यातून 6 लाख 91 हजार 250 डॉलर्स रकमेची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या जवळ पोहेचता येईल. दुर्दैवाने वंतिकाला मायदेशी परतावे लागले आहे, परंतु माजी विश्वविजेती युक्रेनच्या अॅना उशेनिनाविऊद्धचा तिचा विजय बराच काळ आठवणीत राहील. स्पर्धेत छाप पाडून ती बाहेर पडलेली आहे.