For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हार्दिक सिंग, सलिमा टेटे सर्वोत्तम हॉकीपटू

06:31 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
हार्दिक सिंग  सलिमा टेटे सर्वोत्तम हॉकीपटू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2023 च्या सालातील भारताचे जागतिक दर्जाचे हॉकीपटू हार्दिक सिंग आणि सलिमा टेटे यांची अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला हॉकीपटू म्हणून घोषित करण्यात आले. हॉकी इंडियाच्या येथे झालेल्या सहाव्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभामध्ये हार्दिक सिंग आणि सलिमा टेटे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हॉकी इंडियातर्फे प्रत्येक वर्षी सर्वोत्तम पुरूष आणि महिला हॉकीपटूंची निवड केली जाते. हा पुरस्कार भारताचे माजी ऑलिम्पिक हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर यांच्या नावाने दिला जातो. त्यानुसार हार्दिक सिंग आणि सलिमा टेटे यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंगने या पुरस्काराबरोबरच आणखी एक बक्षीस मिळविले आहे. वर्षभरातील मध्यफळीत खेळणाऱ्या सर्वोत्तम हॉकीपटूचा अजितपाल सिंग पुरस्कारही हार्दिक सिंगने मिळविला आहे. हार्दिक सिंगला या दुसऱ्या पुरस्काराबरोबरच रोख 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

Advertisement

2023 च्या कालावधीतील बचाव फळीतील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला देण्यात आला आहे. परगतसिंग यांच्या नावाने हा पुरस्कार ठेवण्यात आला असून हरमनप्रीत सिंगला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. वर्षभरातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा बलजीतसिंग पुरस्कार पी. आर. श्रीजेशने पटकाविला आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम आघाडी फळीतील हॉकीपटूचा धनराज पिल्ले पुरस्कार नवोदित हॉकीपटू अभिषेकला देण्यात आला. महिलांच्या 21 वर्षाखालील वयोगटातील 2023 सालातील उदयोन्मुख खेळाडूचा असूंता लाक्रा पुरस्कार दिपिका सोरेंगने मिळविला आहे. तर पुरूष विभागातील जुगराज सिंग पुरस्कार अर्जितसिंग हुंडालने मिळविला आहे. अर्जितसिंग हुंडाल आणि दिपिका सोरेंग यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. हॉकी क्षेत्रामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मेजर ध्यानचंद आजीवन पुरस्कार अशोककुमारला देण्यात आला असून या पुरस्कारासमवेत रोख 30 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले आहे. चालू वर्षामध्ये हॉकी इंडियातर्फे विविध पुरस्कार विजेत्यांसाठी एकूण 7.56 कोटी रुपयांची रक्कम वाटण्यात आली.

Advertisement

हॉकी इंडियाच्या या पुरस्कार वितरण समारंभाला हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. विवेकसागर प्रसाद, हार्दिक सिंग, निलकांत शर्मा, सुमीत, कृष्णनबहाद्दुर पाठक, उदिता, सलिमा टेटे, गुरुजंत सिंग यांनाही प्रत्येकी 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस व पुरस्कार देण्यात आला. या भारतीय हॉकीपटूंनी प्रत्येकी 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार हॉकी इंडियाने दिला आहे. त्याचप्रमाणे 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या निकी प्रधान, अमित रोहिदास, ललितकुमार उपाध्याय आणि नेहा यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या हरमनप्रीत सिंगला चषक आणि 2 लाख रुपये त्याचप्रमाणे भारतीय हॉकी संघाची गोलरक्षक सविता हिने 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याबद्दल तिला चषक आणि 2.5 लाख रुपये देण्यात आले. 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा गोलरक्षक श्रीजेश याला चषक आणि 3 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. गेल्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघातील वंदना कटारियाने 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केल्याबद्दल तिला गौरविण्यात आले होते. वंदनालाही चषक आणि 3 लाख रुपये देण्यात आले होते. भारताचे 350 सामन्यात प्रतिनिधित्व करणाऱ्या मनप्रितसिंगला चषक आणि 3.5 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. महिलांच्या विभागात दुसऱ्या कॅटॅगेरित वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या दिपिका, मोहित एच. एस., अनु, अंजली बावा, मनिंदरसिंग, दिपिका सोरेंग, मनदिपसिंग, सलिमा, संगीताकुमारी, हरमनप्रीत सिंग यांनाही प्रत्येकी 1 लाख रुपये आणि चषक देण्यात आला. भारतीय महिला गोलरक्षक सविताला गेल्या डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय हॉक फेडरेशनतर्फे 2023 सालातील सर्वोत्तम गोलरक्षकाचा 5 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला होता. हार्दिक सिंग आणि सलिमा टेटे यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

Advertisement
Tags :
×

.