हार्दिक, शुभमनचे कमबॅक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान बीसीसीआयने घरच्या मैदानातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या 15 सदस्यीय संघात हार्दिक पंड्यासह शुभमन गिलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. उभय संघात पाच सामन्यांची टी 20 मालिका 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी सामन्यात मानेला दुखापत झाली होती, यानंतर तो कसोटी व वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. तर टी-20 मालिकेपूर्वी गिल पूर्णपणे फिट झाल्यास त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड केली जाईल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधून गिलचे फिटनेस प्रमाणपत्र मिळण्यावर त्याचे खेळणे अवलंबून असल्याचे बीसीसीआयने सांगितले.
हार्दिकचे पुनरागमन
आशिया कप 2025 स्पर्धेदरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात देखील खेळता आले नाही. तसेच दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालू एकदिवसीय मालिकेमध्ये देखील विश्रांती देण्यात आली होती. तथापि, त्याला आता पूर्ण तंदुरुस्ती मिळवल्यानंतर 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश आहे. दुसरीकडे, या मालिकेसाठी नितीश कुमार रे•ाr, रिंकू सिंगला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
सूर्याकडेच नेतृत्वाची धुरा
रायपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान बीसीसीआयने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवकडेच नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे. ऋषभ पंत दुखापतीतून सावरल्यानंतरही टी-20 मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन व जितेश शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे.
आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.
भारत-द.आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिला टी 20 सामना - 9 डिसेंबर, कटक
- दुसरा टी 20 सामना - 11 डिसेंबर, मुल्लनपूर, चंदीगड
- तिसरा टी 20 सामना - 14 डिसेंबर, धरमशाला
- चौथा टी 20 सामना - 17 डिसेंबर, लखनौ
- पाचवा टी 20 सामना - 19 डिसेंबर, अहमदाबाद.